गेल्या बऱ्याच दिवसांपासून तापमान वाढीमुळे अनेकजणांच्या नाकीनऊ आले आहेत. सूर्याची दाहकता आणि त्यामुळे होणारी काहिली या सर्व त्रासदायक वातावरणामधून काहीसा दिलासा देण्यासाठी चक्क कलाकार सज्ज झाले आहेत असेच म्हणावे लागेल. २०१७चा जून महिना मनोरंजन विश्वासाठी सर्वार्थाने महत्त्वाचा आहे. २८ एप्रिलला प्रदर्शित झालेल्या ‘बाहुबली २’ या चित्रपटाचीच जादू संपूर्ण मे महिना पाहायला मिळाली. गेल्या महिन्यात बॉलिवूडमध्ये काही मोठे चित्रपट प्रदर्शित झाले. मात्र, ‘बाहुबली’च्या भव्यतेपुढे एकही चित्रपट तग धरू शकला नाही. त्यात मराठीला मात्र सुगीचे दिवस आल्याचे दिसले. परेश मोकाशी दिग्दर्शित ‘चि. व चि.सौ.कां’ या चित्रपटाने प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले. आता या महिन्यात सलमान खान, आकाश ठोसर, श्रीदेवी यांसारख्या प्रसिद्ध कलाकारांचे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. ‘बाहुबली’च्या जादूपुढे हे चित्रपट तग धरतात का ते बॉक्स ऑफिसवरील कमाईच्या आकड्यांतून दिसून येईलच.

२ जूनला मराठी चित्रपटसृष्टीत दोन महत्त्वाचे चित्रपट प्रदर्शित होत आहे. ‘सैराट’मधून चित्रपटसृष्टीत पदार्पण करून सर्वांना याड लावणाऱ्या आकाश ठोसरचा ‘एफयू’ आणि वेब सीरिज क्वीन मिथिला पालकर, अमेय वाघ यांचा ‘मुरांबा’ हे दोन चित्रपट एकाच दिवशी येत आहेत. दोन्ही चित्रपटांचा जॉनर पूर्णपणे वेगळा आहे. ‘मुरांबा’ हा दिग्दर्शक वरुण नार्वेकर यांचा पहिलाच चित्रपट आहे. आणि पहिल्याच चित्रपटात आई-वडील आणि मुलगा-मुलगी अशा सरळ वळणाच्या कौटुंबिक कथेला तिरपा छेद देणारी कथा त्याने रंगवली आहे. तेही सचिन खेडेकर, चिन्मयी सुमित, अमेय वाघ आणि मिथिला पालकर अशा आजवर न पाहिलेल्या जोडय़ा घेऊन..

वाचा : अस्वस्थ वाटू लागल्याने कपिल शर्मा रुग्णालयात दाखल

‘एफयू’ म्हणजेच ‘फ्रेंडशीप अनलिमिटेड’ या नावातूनच सर्व काही कळतं. पाच मित्रांच्या कॉलेज लाइफवर आधारित चित्रपटाची कथा असून आकाश यात साहिलच्या भूमिकेत दिसेल. महेश मांजरेकर दिग्दर्शित या चित्रपटात आकाश, संस्कृती बालगुडे, सत्या मांजरेकर, वैदेही परशुरामी, मयुरेश पेम, शुभम यांच्याही भूमिका आहेत. विशेष म्हणजे बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान याने पहिल्यांदाच मराठी चित्रपटासाठी गाणे गायले आहे. ‘एफयू’तील ‘गच्ची’ गाणे त्याच्या आवाजात रेकॉर्ड करण्यात आलेय.

राबता- क्रिती सनॉन आणि सुशांत सिंग राजपूत यांच्या प्रेमाच्या चर्चा सध्या खूप रंगत आहेत. त्याचप्रमाणे ‘राबता’च्या कमाईचीही चर्चा होणार का ते आपल्याला ९ जूननंतरच कळेल. या चित्रपटात दोन काळ दाखविण्यात आले असून, राजकुमार राव यात साकारलेल्या ३६५ वर्षीय म्हाताऱ्याच्या लूकने प्रेक्षकांचे लक्ष वेधण्यात यश मिळवले आहे. मात्र, या चित्रपटाच्या कथेवरून काही वाद असल्याने न्यायालयात त्याविरुद्ध खटला दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

वाचा : प्रियांकाच्या तोकड्या कपड्यांच्या मुद्द्यावर बिग बी म्हणतात…

टी टी एम एम- काही दिवसांपूर्वी ललित प्रभाकर आणि नेहा महाजन यांच्यात ट्विटरवर ‘कोल्ड वॉर’ रंगल्याचे पाहायला मिळाले. दोघांच्यात नक्की कशावरुन वॉर सुरु आहे, असा प्रश्नही त्यांच्या चाहत्यांना पडला. मात्र, आगामी ‘तुझं तू माझं मी’ (‘टी टी एम एम’) चित्रपटाच्या पहिल्या टिझर पोस्टरच्या प्रदर्शनानंतर ललित आणि नेहाच्या आगामी भेटीची ती चाहुल असल्याचे स्पष्ट झाले होते. कुलदीप जाधव दिग्दर्शित आणि मीरा एण्टरटेनमेन्ट आणि वैशाली एण्टरटेनमेन्ट प्रस्तुत ‘टी टी एम एम’ चित्रपटामध्ये नेहा आणि ललितची धमाल जोडी पहिल्यांदाच एकत्र प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘टी टी एम एम’ हा चित्रपट १६ जून २०१७ रोजी प्रदर्शित होणार आहे.

बँक चोर- ‘मस्ती’सारखा हिट चित्रपट देणारे रितेश देशमुख आणि विवेक ऑबेरॉय हे पुन्हा एकदा ‘बँक चोर’ मधून १६ जूनला धमाल करण्यास सज्ज झाले आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन बंपी याने केलं असून निर्मिती यश राज बॅनरचे यूथ प्रॉडक्शन हाऊस ‘व्हाय- फिल्म्स’ने केलीय.

फुल्लू- अक्षय कुमारचा ‘पॅडमॅन’ हा चित्रपट त्याच्या नावामुळे आणि एकंदर कथानकामुळेच चर्चेत आला आहे. सॅनिटरी नॅपकिनविषयीच्या मुद्दयावर ‘पॅडमॅन’ प्रकाश टाकणार आहे. पण आता याच विषयावर आधारित आणखी एक चित्रपट येतोय. या चित्रपटाचं नाव आहे ‘फुल्लू’. ‘फिल्मिस्तान’चा अभिनेता शारिब हाशमीची मुख्य भूमिका असलेला ‘फुल्लू’ १६ जूनला प्रदर्शित होईल.

ट्युबलाइट- बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा बहुप्रतिक्षित ‘ट्युबलाइट’ चित्रपट ईदच्या मुहुर्तावर २३ जूनला प्रदर्शित होईल. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर सलमानच्या चाहत्यांनी चक्क त्याच्या घराबाहेर गर्दी केली होती. आतषबाजी करत ढोल-ताशांच्या गजरात अनोख्या पद्धतीने चाहत्यांनी चित्रपटाच्या ट्रेलरला दाद दिली होती. सलमान व्यतिरीक्त चित्रपटात सोहेल खान, चीनी अभिनेत्री झू झू, बालकलाकार माटिन रे तंगू, दिवंगत अभिनेते ओम पुरी यांच्या भूमिका असून शाहरुख खान यात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसेल.

शब- आव्हानात्मक भूमिकांना स्वीकारणारी अभिनेत्री रविना टंडन ‘मातृ’नंतर ‘शब’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. रविनाची नकारात्मक भूमिका असलेला हा चित्रपट ३० जूनला प्रदर्शित होईल.

या चित्रपटांव्यतिरीक्त या महिन्यात ‘अ डेथ इन द गुंज’, ‘स्विटी वेड्स एनआरआय’, ‘बेहेन होगी तेरी’, ‘अतिथी इन लंडन’ हे चित्रपटदेखील प्रदर्शित होणार आहेत.