रोज संध्याकाळी सातचा ठोका झाला की मराठी कुटुंबातील घरांमधून मालिकांचे आवाज येऊ लागतात. ‘तुझ्यात जीव रंगला’, ‘सरस्वती’, ‘माझ्या नवऱ्याची बायको’, ‘गोठ’ अशा लागोपाठ अनेक मालिका रांगेत सुरुच असतात. मालिकांचा बराचसा प्रभाव प्रेक्षकांच्या जीवनावरही पडताना दिसतो. सोमवार ते शनिवारमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या मालिकांमधील पात्रं अनेकांच्या जवळचीच होऊन जातात. अशा या विविध मालिकांच्या टीआरपीमध्ये प्रेक्षकांचा मोलाचा वाटा असतो. गेल्या आठवड्यातील टीआरपी रँकिंगमध्ये झी मराठीच्या पाच मालिकांनी बाजी मारण्यात यश मिळवले आहे. ‘ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काउन्सिल इंडिया’ म्हणजे ‘बार्क’ने (BARC) १ ते ७ जुलैपर्यंत झालेल्या भागांच्या आधारे मालिकांचे टीआरपी रेटिंग जाहीर केले आहे. दरम्यान, हे रेटिंग आधी दिलेल्या कालावधीसाठीचे आहे. त्यामध्ये प्रत्येक आठवड्यात बदलही होऊ शकतो, हे सुद्धा लक्षात घ्यावे लागेल.
तुझ्यात जीव रंगला –
‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेत राणा आणि अंजलीची प्रेम कहाणी सध्या रंगत चालली आहे. स्त्रियांपासून दूर जाणाऱ्या राणावर लग्नाच्या प्रेमाची जादू चालत असल्याचे दिसतेय. या दोघांच्या प्रेमकहाणीने टीआरपीमध्येही बाजी मारली असून, ५५२९ इम्प्रेशनसह ही मालिका पहिल्या स्थानावर आहे.
माझ्या नवऱ्याची बायको-
गुरु आणि राधिकाचं नातं आता तग धरत असतानाच शनायाने त्यांच्या आयुष्यात पुन्हा एण्ट्री केल्याचं पाहायला मिळत आहे. गॅरीने आपल्याला दूर केल्याची भावना शनायाच्या मनात असल्यामुळे ती आता त्यांच्याच बिल्डिंगमध्ये राहायला आली आहे. ही मालिका ५५१६ इम्प्रेशनसह दुसऱ्या स्थानावर आहे.
वाचा : …आणि अनिकेतला पाण्यात ढकलून पूजाने काढला पळ
चला हवा येऊ द्या भारत दौरा
भारत दौऱ्यावर असलेली निलेश आणि टीम ३०१६ इम्प्रेशनसह तिसऱ्या स्थानी आहेत.
काहे दिया परदेस
शिव आणि गौरीचे प्रेम फुलत असून, लवकरच त्यांच्या आयुष्यात बाळाचं आगमन होणार आहे. पण, गौरीच्या सासूची कटकारस्थानं काही केल्या थांबत नाहीयेत. २६६७ इम्प्रेशनसह ही मालिका चौथ्या स्थानावर आहे.
वाचा : ही मराठी अभिनेत्री करतेय अर्जितला डेट?
लागिरं झालं जी-
आपल्या मित्राला मदत करता करता अजिंक्य आणि शीतल एकमेकांच्या प्रेमात पडतील याबाबत अजिबात शंका नाही. देशाच्या रक्षणासाठी सैन्य दलात जाण्याची इच्छा असलेल्या अजिंक्यची ही मालिका २०३० इम्प्रेशनसह पाचव्या स्थानावर आहे.