कलर्स मराठी वाहिनीवरील अस्सल पाहुणे इरसाल नमुने हा कार्यक्रम सध्या चांगलाच चर्चेत आहे. कारण यामध्ये अनेक नामवंत कलाकार आणि इतर क्षेत्रामधील दिग्गज व्यक्ती त्यांच्याबद्दल बऱ्याच माहीत नसलेल्या गोष्टी प्रेक्षकांना सांगतात. या प्रसिद्ध आणि लोकप्रिय व्यक्तिमत्त्वांची दुसरी बाजू प्रेक्षकांना या कार्यक्रमात पाहायला मिळते. या आठवड्यात सयाजी शिंदे आणि तुकाराम मुंढे यांनी हजेरी लावली. मातीशी नातं आणि कामाशी इमान जपणाऱ्या या अस्सल पाहुण्यांनी मनमुराद गप्पा मारल्या. यावेळी तुकाराम मुंढेंनी बरेच किस्से प्रेक्षकांना सांगितले.

एका गणपती मंडळाने प्रमुख पाहुणा म्हणून बोलावलं असता त्याच मंडळाचे अतिक्रमण हटवल्याची कारवाई केल्याच्या प्रसंगाबद्दल मकरंद अनासपुरेनं विचारलं. हा प्रसंग सांगताना तुकाराम मुंढे म्हणाले, ‘असे प्रसंग माझ्या जीवनात बरेच आले. नाशिकमधल्या ग्रामदैवत मंदिरात मला बोलावलं होतं. मी सहसा अशा कार्यक्रमांमध्ये जाणं टाळतो. पण आग्रह खूप होता म्हणून जावं लागलं. तिथे गेल्यानंतर मला बाहेर अतिक्रमण दिसलं. माझ्या अधिकाऱ्यांना मी ते काढण्याचे आदेश दिले. त्यानंतर आत गेलो आणि आरती केली. पुन्हा बाहेर जाताना तिथल्या एक-दोन दुकानांमध्ये प्लास्टिकचा वापर होताना दिसलं. त्यांना प्लास्टिक वापरणं बंद करा नाहीतर संध्याकाळपर्यंत दुकानं काढून टाकीन असा इशारा दिला. हे काही मी दाखवण्यासाठी करत नाही. समोर चुकीचं घडताना दिसत असताना तुम्ही गप्प राहणं म्हणजे त्या चुकीला समर्थन देणं, असं माझं मत आहे.’

काम करताना, कारवाई करताना काही गोष्टींकडे दुर्लक्ष करायचं, असा सल्ला मला बरेच जण देतात असंही ते म्हणाले. पण जर ते लोकांच्या हिताचं असेल तर मी नक्कीच दुर्लक्ष करीन पण फक्त स्वत:च्या हितासाठी म्हणून चुकीच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करणार नाही असंही ठाम मत त्यांनी मांडलं.

तुकाराम मुंढे आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी आणि नियमांसाठी ओळखले जातात. त्यांच्या काम करण्याच्या बेधडक पद्धतीवर अनेकांनी आक्षेप घेतला. यासाठी त्यांची बऱ्याचदा बदलीही झाली. पण तरीही न डगमगता प्रामाणिकपणे ते काम करताना दिसतात.