छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो चला हवा येऊ द्या या मालिकेने आजवर प्रेक्षकांना कायमच खळखळून हसवलं आहे. या कार्यक्रमातील निलेश साबळे, भाऊ कदम, कुशल बद्रिके, सागर कारंडे , भारत गणेशपुरे आणि श्रेया बुगडे यांनी आपल्या विनोदबुद्धीने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. त्यामुळे त्यांची लोकप्रियता अफाट आहे. विशेष म्हणजे या कलाकारांव्यतिरिक्त कार्यक्रमातील प्रसिद्ध संगीत संयोजक आणि संगीतकार तुषार देवल याचीही लोकप्रियता तितकीच आहे. कधी एखाद्या प्रसंगाला योग्य संगीत देत, तर कधी आगरी भाषेमध्ये हटके बोलत तो प्रेक्षकांची मन जिंकतो. विशेष म्हणजे लोकप्रिय ठरत असलेल्या तुषारची बायकोदेखील कलाविश्वाशी निगडीत असून तीदेखील त्याच्याप्रमाणेच लोकप्रिय अभिनेत्री आहे.
कलाविश्वामध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटविणारी अभिनेत्री स्वाती देवल तुषारची बायको असून त्यांनी २६ ऑक्टोबर २००३ मध्ये लग्न केलं. स्वाती आतापर्यंत ‘कुंकू’, ‘कळत नकळत’, ‘पारिजात’, ‘वादळवाट’, ‘विवाहबंधन’, ‘फु बाई फु’, ‘पुढचं पाऊल’ यांसह अनेक मालिकांमध्ये झळकली आहे. विशेष म्हणजे केवळ मराठीच नाही तर स्वातीने हिंदी मालिकांमध्येही तिच्या अभिनयाचा ठसा उमटविला आहे.
दरम्यान, तुषार आज मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय संगीत संयोजक म्हणून ओळखला जातो. त्याने ‘चला हवा येऊ द्या’व्यतिरिक्त ‘घडलंय बिघडलंय’, ‘इंडियाज बेस्ट ड्रामेबाज’, ‘रणवीर कॅफे’, ‘हास्यसम्राट’ अशा अनेक शोजसाठी त्याने संगीत संयोजक म्हणून भूमिका बजावली.