छोटा पडदा असो किंवा रुपेरी पडदा या झगमगत्या कलाविश्वाचा अनेकांनाच हेवा वाटतो. मुख्य म्हणजे कॅमेऱ्यासमोर दिसणाऱ्या कलाकारांचे आयुष्य किती सुकर असते, त्यांना हजारो- लाखो प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळते असेच अनेकांना वाटते. पण, वस्तूस्थिती मात्र काही वेगळेच सांगून जाते. झी टीव्ही वरील ‘ऐसी दिवानगी देखी नही कभी’ या मालिकेतील कलाकारांचा अनुभव पाहता असे म्हणणे वावगे ठरणार नाही. ‘बॉम्बे टाईम्स’ला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्री ज्योती शर्मा आणि प्रणव मिश्रा या दोन्ही कलाकारांनी त्यांना सेटवर दिल्या जाणाऱ्या वागणूकीवरुन पडदा उचलत मालिकेतून काढता पाय घेण्याचा निर्णय घेतला आहे.

ज्योती आणि प्रणव या दोघांनीही दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडून तासन् तास काम करुन घेतले जायचे. ‘जानेवारी २०१७ पासून मालिका सुरु झाली त्याच दिवसपासून आमचे एक प्रकारे शोषण केले जात होते. दिवसातील जवळपास १८ तास आमच्याकडून काम करुन घेतले जात होते. कामाच्या वाढीव तासांमध्ये आम्हाला चहा, पाणी, खाणं काहीच विचारले जात नव्हते. एकंदरच तेथील नकारात्मक वातावरण पाहता तिथे काम करण्याची माझी इच्छाच नव्हती’, असे ज्योती म्हणाली.

आम्हाला जणू एखाद्या जनावराप्रमाणे वागणूक दिली जात होती. असे म्हणत या सर्व परिस्थितीमुळे आम्ही नैराश्याचाही सामना केल्याचे प्रणवने स्पष्ट केले. ‘सिंटा’ने दिलेल्या सल्ल्यानंतर नैराश्य, ताणतणावाचा सामना करण्यासाठी या दोन्ही कलाकारांनी डॉक्टरांचीही मदत घेतल्याची माहिती समोर आली आहे. मालिकेच्या सेटवर सुरक्षा व्यवस्थेतही निर्मात्यांनी हलगर्जीपणा केल्याचे ज्योतीने सांगितले.

पाहा : Throwback Thursday : जुन्या जाहिरातींचा खजाना

ज्योती आणि प्रणवने मालिकेच्या निर्मात्यांवर केलेले हे आरोप पाहता आता त्यावर ‘सिंटा’ CINTAA (सिने अँड टीव्ही आर्टिस्ट्स असोसिएशन) काय निर्णय देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. ज्योती आणि प्रणवने केलेल्या आरोपांविषयी ‘सिंटा’चे सरचिटणीस सुशांत सिंह यांनी आपले मत मांडले आहे. या दोन्ही कलाकारांनी तोंड दिलेल्या परिस्थितीविषयी आता मालिकेचे निर्माते आपली बाजू मांडल्यानंतरच या प्रकरणात पुढील निर्णय घेण्यात येतील असे त्यांनी स्पष्ट केले.