छोट्या पडद्यावर तुफान लोकप्रिय ठरलेला कार्यक्रम म्हणजे ‘द कपिल शर्मा शो’. आजवर या कार्यक्रमात अनेक दिग्गजांनी हजेरी लावली आहे. विशेष म्हणजे हा कार्यक्रम पाहण्यासाठी विदेशातील काही प्रेक्षकांनीदेखील हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं आहे. मात्र, हा गाजत असलेला शो लवकरच बंद होणार असल्याचं म्हटलं जात आहे. करोना काळात घेण्यात आलेल्या लॉकडाउनचा फटका या कार्यक्रमाला बसला असून हा शो बंद होणार असल्याचं ‘इंडिया टुडे’च्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.
करोना संकटामुळे देशात लॉकडाउन घोषित करण्यात आला होता. या काळात प्रत्येक क्षेत्रातील कामकाज बंद ठप्प झालं होतं. त्यामुळे सहाजिकच त्याचा परिणाम कलाविश्वावरही झाला. याच काळात कपिल शर्मा शोमध्ये दर्शकांना प्रवेश नव्हता. मात्र, आता हा कार्यक्रम ऑफ एअर जाणार असल्याचं म्हटलं जात आहे. विशेष म्हणजे हा कार्यक्रम बंद झाला तरीदेखील कपिल शर्मा एका नव्या रुपात प्रेक्षकांसमोर येणार आहे.
View this post on Instagram
‘कपिल शर्मा शो’ बंद झाल्यानंतर कपिल शर्मा नव्या रुपात प्रेक्षकांसमोर येणार आहे. मात्र, त्यासाठी प्रेक्षकांना काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. परंतु, याविषयी कपिल शर्मा किंवा सोनी टीव्हीकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
पाहा : पूजा सावंतने सांगितलं निगेटिव्ह कमेंट्स डिलिट करण्यामागचं कारण; म्हणाली…
दरम्यान, ‘कपिल शर्मा शो’ या कार्यक्रमात आजवर अनेक दिग्गजांनी हजेरी लावली आहे. अनेक चित्रपटांचं प्रमोशन या शोच्या मंचावर झालं आहे. त्यामुळे हा शो विशेष लोकप्रिय आहे. तसंच या कार्यक्रमातील कलाकारांनी त्यांच्या विनोदबुद्धीने प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केल्याचंदेखील पाहायला मिळालं आहे.