रोड ट्रिप म्हटलं की, डोळ्यांसमोर येते खूप सारी धमाल, मस्ती, बाजूच्या निसर्गाचा मनापासून आस्वाद घेत आवडत्या व्यक्तीसोबत घालवलेले अविस्मरणीय क्षण.. रोड ट्रिपची आपली आवडती कंपनी म्हणजे मित्रांचा ग्रुपही असू शकतो किंवा अगदी प्रेयसी- प्रियकर, नवरा- बायको, कदाचित सगळी फॅमिलीसुद्धा. पण सख्खा भाऊ -बहिणींसोबत तुम्ही कधी अशी रोड ट्रिप केली आहे का? भावंडांबरोबरची रोड ट्रिप किती रंजक असू शकते? ‘ट्रिपलिंग’ या वेब सीरिजमध्ये हीच कथा मांडण्यात आली होती. ही वेब सीरिज तरुणाईमध्ये खूप गाजली. पहिल्या सिझननंतर या सीरिजच्या दुसऱ्या सिझनची जोरदार मागणी होऊ लागली होती. आता प्रेक्षकांची ही प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. कारण ‘ट्रिपलिंग’चा दुसरा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
सुमित व्यास, अमोल पाराशर यांनी सोशल मीडियावर या नव्या सिझनचा पोस्टर शेअर केला आहे. चंदन, चितवन आणि चंचल या तीन भूमिका या पोस्टरमध्ये पाहायला मिळत आहेत. ‘फिर से ट्रिपलिंग’ असं नव्या सिझनचं नाव आहे. येत्या मार्चमध्ये ही वेब सीरिज प्रदर्शित होणार आहे. दुसऱ्या सिझनची कथा पहिल्या सिझनपासून पुढे नेणारी असेल की त्याहून वेगळी हे अद्याप स्पष्ट झाले नाही.
The real baba and the real #madafaka and the real #dramaqueen
Pack your bags (waise baggage to hai hi) because it’s time for another #roadtrip #phirsetripling #tripling2withdrivezy #triplingseason2@amolparashar @EightyPackAbs @TheViralFever @MrAkvarious pic.twitter.com/S67qw7Egil— Sumeet Vyas (@vyas_sumeet) February 1, 2019
‘ट्रिपलिंग’ या वेब सीरिजचा मुख्य विचार बदलत्या कौटुंबिक संकल्पना हाच आहे. मोठय़ा भावाचा घटस्फोट होतो तेव्हा लहान भावाला त्याचं लग्न झालं होतं हे समजतं. बहिणीच्या आयुष्यात अनेक समस्या येत असतात. आपण प्रेग्नंट असल्याविषयी ती घरी खोटं बोललेली असते आणि ते दोघा भावांना माहीत नसतं. लहान भाऊ कर्जबाजारी झालाय, त्याला एकदा जेलमध्येही जावं लागलंय याबद्दल इतर भावंडांना कल्पनाही नसते. सध्याच्या सेल्फ सेंटर्ड आयुष्यावर वेगळ्या पद्धतीने भाष्य करणारी ही मालिका होती. रोड ट्रिप सुरू झाल्यावर हळूहळू या भावंडांच्या आयुष्यातलं एक एक गुपीत उघड होत जातं आणि तिघेही एकमेकांच्या आणखी जवळ येतात. तरुणांच्याच भाषेत आजच्या परिस्थितीवर भाष्य करणारी ही मालिका असल्यामुळे यंगिस्तानला ती जास्त भावली होती.