‘परमनंट रुममेट्स’, ‘ट्रिपलिंग’ या वेब सीरिजमधून झळकलेला अभिनेता सुमित व्यास अनेकांच्या आवडत्या अभिनेत्यांपैकी एक आहे. सलमान, शाहरुखप्रमाणे त्याच्या नावाभोवती असंख्य चाहत्यांचा गराडा नसला तरीही या अभिनेत्याने स्वत:चा असा वेगळा चाहता वर्ग निर्माण केला आहे हे नाकारता येणार नाही. काही चित्रपटांमध्येही झळकलेला हा अभिनेता आता एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याची ही भूमिका बऱ्याच कारणांनी महत्त्वाची आहे. कारण, सुमितला चक्क अभिनेत्री करिना कपूरसोबत स्क्रीन शेअर करण्याची संधी मिळाली आहे.
आगामी ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटासाठी सुमितची वर्णी लागली असून तो चक्क करिनासोबत रोमान्स करणार आहे. करिना कपूर आणि सोनम कपूर यांच्या मुख्य भूमिका असणारा हा चित्रपट सुमितच्या कारकिर्दीला महत्त्वाची कलाटणी देणारा ठरु शकतो. याआधी तो श्रीदेवीच्या ‘इंग्लिश विंग्लिश’ या चित्रपटातून झळकला होता. त्यामुळे आता या चित्रपटामध्ये त्याची भूमिका नेमकी कशी असणार याविषयीच्या चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे. ‘मुंबई मिरर’च्या वृत्तानुसार सध्या या चित्रपटातील भूमिकेसाठी चर्चा सुरु असून त्यासंबंधीची अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
सुमित व्यास हे वेब सीरिज विश्वातील एक प्रसिद्ध नाव आहे. अफलातून अभिनय कौशल्यामुळे सुमितच्या चाहत्यांच्या आकड्यात दिवसेंदिवस वाढच होत आहे. त्यात आता सुमित करिनासोबत स्क्रीन शेअर करणार असल्यामुळे चाहत्यांमध्ये या जोडीविषयी बऱ्याच चर्चांना उधाण येत आहे. तैमुरच्या जन्मानंतर करिना पुन्हा एकदा तिच्या करिअरकडे लक्ष देत आहे. त्यामळे ही सुपरमॉम पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
पाहा : VIDEO स्टुडिओबाहेर गुंडांनी भाऊ कदमवर पिस्तुल रोखलं
दरम्यान, या चित्रपटाच्या बऱ्याच भागाचं चित्रीकरण दिल्लीमध्ये करण्यात येणार आहे. चित्रपटाच्या चित्रीकरणाची दोन भागांमध्ये आखणी करण्यात आली आहे. ‘वीरे दी वेडिंग’मध्ये करिना आणि सोनम व्यतिरिक्त अभिनेत्री स्वरा भास्कर आणि शिखा तलसानियासुद्धा झळकणार आहेत.