भारतात काही महिन्यांपूर्वी लागू करण्यात आलेल्या जीएसटीवरून सोशल मीडियावर अनेक विनोद व्हायरल झाल्याचे पाहायला मिळाले. आता कुठे जीसटीला होणारा विरोध शमत असल्याचे चित्र असतानाच अभिनेत्री, लेखिका ट्विंकल खन्नाने एका बाणात दोन पक्षी मारत जीएसटी आणि ‘पद्मावती’च्या मुद्द्यावर लक्षवेधी ट्विट केले आहे.

वाचा : १५ वर्षांच्या संसारानंतर हे मराठी सेलिब्रिटी जोडपे होणार विभक्त

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावती’ चित्रपटाचा वाद दिवसेंदिवस अधिक चिघळत चालला आहे. या चित्रपटात इतिहासाची छेडछाड केल्याचा आरोप करत अनेक राजपूत संघटनांनी ‘पद्मावती’ला विरोध केला आहे. तसेच, चित्रपटाच्या प्रदर्शन होण्यासही त्यांनी हरकत दर्शविली आहे. इतकेच नव्हे, हरयाणातील भाजप नेता सुरज पाल अमू यांनी तर चित्रपटात राणी पद्मिनीची भूमिका साकारणारी अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि दिग्दर्शक भन्साळींचा शिरच्छेद करणाऱ्याला दहा कोटींचे बक्षीसही जाहीर केले. त्यांच्या या घोषणेची खिल्ली उडवणारे ट्विट ट्विंकल खन्नाने केले. तिने लिहिलंय की, ‘या दहा कोटींमध्ये जीएसटीसुद्धा आहे का, हे देशाला जाणून घ्यायचे आहे.’ गेल्या काही दिवसांपासून लागू करण्यात आलेली जीएसटी करप्रणाली या बक्षिसाच्या रकमेतही लागू करण्यात आली आहे का, असा उपरोधिक प्रश्न तिने या ट्विटमधून विचारला आहे. तेव्हा आता तिच्या या प्रश्नाचे उत्तर कोण देणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

वाचा : व्हायरल होणाऱ्या सुंदर महिला पोलीस अधिकाऱ्याच्या फोटोमागचे सत्य

नुकतीच ‘पद्मावती’च्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. त्यावर अनेक सेलिब्रिटींनी आपली नाराजी व्यक्त केली. ट्विंकलनेही चित्रपटाचे समर्थन करत लिहिलं की, पद्मावती हा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरू दे. जेणेकरून धमकी देणाऱ्यांना सडेतोड उत्तर मिळेल.