हरियाणातील गुरुग्राम येथील बलात्काराच्या घटनेने संपूर्ण देश हादरुन गेला आहे. फक्त सर्वसामान्यांनाच नाही तर सेलिब्रिटींनीही अशा निर्घृण कृत्याचा विरोध केला आहे. प्रसिद्ध गायक अरिजीत सिंगने गुरुग्राममध्ये झालेल्या या कृत्याबद्दल खेद व्यक्त केला. अरिजीतने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्विटरवर टॅग करत म्हटले की, ‘ सर आपण अमानवी क्रूरता रोखू शकत नाही तर बलात्कार आणि हत्या कशा रोखणार? तुम्ही या प्रकरणात काही करू शकता का? तुम्हाला विनंती करतो की काही तरी करा. त्यानंतरच्या ट्विटमध्ये अरिजीतने लिहिले की, ‘जास्ती करून अशाच प्रकारच्या घटना ऐकू येत असतात. अशा घटनांमुळेच भारताचं नाव खराब झालं आहे. तिसऱ्या ट्विटमध्ये अरिजीतने लिहिले की, ‘मला अशा लोकांना मारण्याची संधी मिळाली तर मी जराही घाबरणार नाही.’

हरियाणा येथील गुरुग्राममध्ये एका महिलेवर सामुहिक बलात्कार करुन तिच्या ९ महिन्याच्या मुलीची हत्या करण्यात आली होती. या घटनेतील तीनही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. पीडितेने रात्री रस्त्यावर रिक्षा मिळत नसल्याने रिक्षाचालकाकडे लिफ्ट मागितली होती. रिक्षेत चालक आणि आणखी दोघे आधीच बसले होते. त्यांनी महिलेला निर्जन स्थळी नेले आणि तिथे तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्यातील एकाने तिच्या अवघ्या नऊ महिन्यांच्या मुलीला निर्दयीपणे रिक्षाबाहेर फेकले. त्यात तिचा मृत्यू झाला. चिमुकलीचा मृतदेह घेऊन बलात्कार पीडिता मेट्रोत ७ तास भटकत राहिली होती.

पीडित महिलेवर रुग्णालयात उपचार सुरु असून तिची प्रकृती गंभीर आहे. मात्र अशा स्थितीतही तिने पोलिसांना महत्त्वाची माहिती दिली. गावातील सरपंचाला नराधमांविषयी माहिती असू शकते. त्यांच्याकडे टेम्पो आणि रिक्षाचालक काम करत असल्याची माहिती तिने दिली होती.