अभिनय आणि राजकारण या दोन्ही क्षेत्रांमध्ये आपली छाप पाडणारे परेश रावल पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. फुटिरतावादी नेता मीरवाइज उमर फारुकच्या ट्विटवर संताप व्यक्त केल्यामुळे एका पाकिस्तानी नागरिकाने परेश रावल आणि इतर भारतीयांना गोमूत्र पिणारे म्हणून संबोधले आहे. या टीकेनंतर परेश रावल यांनीही त्या व्यक्तीला आपल्या शैलीत धारेवर धरलं आहे. मीरवाइजने पाकिस्तान- इंग्लंडदरम्यान झालेल्या सामन्यानंतर पाकिस्तानी क्रिकेट संघाचं अभिनंदन केलं होतं. पाकिस्तानी क्रिकेट संघाच्या खेळाची प्रशंसा करत मीरवाइजने त्यांना अंतिम सामन्यासाठी शुभेच्छाही दिल्या.

त्याच्या या शुभेच्छा देणं भारतीयांना काही रुचलं नाही. त्यामुळे अनेकांनीच या ट्विट्सवर निशाणा साधला. भारतीय जनता पार्टीचे खासदार परेश रावल यांनीही ट्विटरवरुन मीरवाइजवर निशाणा साधला. ‘मीरवाइज गद्दार आहे. त्यासोबतच तो फुटिरतावादी असून पाकिस्तानचा चमचा आहे. त्यामुळे त्याच्या ट्विटविषयी फारसं बोलण्यात काहीच अर्थ नाही’, असं रावल त्यांच्या ट्विटमधून म्हणाले.

त्यांच्या या ट्विटनंतर बऱ्याच विषयांना तोंड फुटलं. लतीफ खान नामक एका पाकिस्तानी ट्विटर युजरने परेश रावल आणि त्यांच्या समर्थनार्थ बोलणाऱ्यांविरोधात ट्विट करण्यास सुरुवात केली. त्याने परेश रावल आणि त्यांना दुजोरा देणाऱ्यांचा दर्जा खालावला आहे असंही म्हटलं आहे. लतीफने इतक्यावरच न थांबता परेश रावल आणि इतर भारतीयांना उद्देशून ‘तुम्ही जिथेही जाता तिथे गोमूत्र पिता’, असं म्हणत लतीफने पुन्हा एकदा वादाला तोंड फोडलं. पण, त्याच्या या ट्विटकडे परेश रावल यांनी जास्त लक्ष दिलं नाही. भारत- पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये असणारे मतभेद पाहता या देशातील नागरिकांमध्ये सोशल मीडियावरही बरेच खटके उडाल्याचं पाहायला मिळालं आहे.

paresh-rawal

वाचा : जाणून घ्या अनुराग कश्यपच्या २३ वर्षीय गर्लफ्रेंडविषयी…

दरम्यान, ट्विटमुळे चर्चेत येण्याची परेश रावल यांची ही पहिलीच वेळ नाहीये. गेल्या बऱ्याच दिवसांपासून त्यांचं नाव विविध कारणांनी चर्चेत येत आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळेही नव्या वादाला तोंड फुटलं होतं. कलाकार आणि क्रिकेटर बॉम्ब फेकत नाहीत असं म्हणत त्यांनी पाकिस्तानी कलाविश्वात काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती.