वरिष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी नाराजी व्यक्त करत अभिनेते प्रकाश राज यांनी त्यांना मिळालेले राष्ट्रीय पुरस्कार परत करणार असल्याचे म्हटले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे माझ्यापेक्षाही चांगले अभिनेते आहेत, असा टोला लगावत त्यांनी ‘अच्छे दिन’वरुनही त्यांच्यावर निशाणा साधला होता. प्रकाश राज यांची आणखी एका पुरस्काराची निवड झाली असतानाच केंद्रीय मंत्री सदानंद गौडा यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली. ‘पुरस्कार परत करायचे होते तर त्यांनी ते स्विकारायलाच नको होते,’ असे गौडा म्हणाले.

‘गौरी लंकेश यांच्या हत्येचे काही लोकांकडून समर्थन केले जाते. त्यांच्याकडून लंकेश यांच्या खुनाबद्दल आनंद व्यक्त केला जातो आणि अशा लोकांना पंतप्रधान ट्विटरवर फॉलो करतात,’ असे आरोप प्रकाश राज यांनी केला होता. मोदींनी गौरी लंकेश यांच्याप्रकरणी यापुढेही मौन बाळगले तर पाचही राष्ट्रीय पुरस्कार परत करण्याचा इशारा त्यांनी दिला होता. मात्र नंतर त्यांनी हे वृत्त फेटाळले. राष्ट्रीय पुरस्कार परत करायला मी मूर्ख नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी या प्रकरणावर भाष्य करताना दिली होती.

‘ते खूप चांगले अभिनेते आहेत. परंतु आजकाल त्यांची विचारसरणी ही डाव्या पक्षांना पाठिंबा देणारी आहे. जो अभिनेता पुरस्कार परत करणार असल्याचे म्हणतो त्याने पुरस्कार स्वीकारायचेच नाहीत, हे माझे वैयक्तिक मत आहे,’ असे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री गौडा म्हणाले.
प्रकाश राज यांना ‘डॉ. कोटा शिवराम करंथ हुत्तरा प्रशांत’ या पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. तर पुरस्काराच्या निवड समितीतील भाजप सदस्यांनी सोहळ्यास उपस्थित राहणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.