बॉलिवूड अभिनेता सोहेल खान आज त्याचा ४८ वा वाढजिवस साजरा करत आहे. खान कुटुंबातील शेंडेफळ असणाऱ्या सोहेलचे व्यावसायिक आयुष्य जेवढे कठीण होते तशाच चढउतारांचा सामना त्याला वैयक्तिक जीवनातही करावा लागला. सोहेल आणि सीमा यांच्या लग्नाला सीमाच्या घरातल्यांचा विरोध होता. यामुळे दोघांनी आर्य समाज मंदिरात जाऊन लग्न केले. सोहेलच्या या निर्णयामुळे खान कुटुंबातील प्रत्येकजण त्याच्यावर नाराज होता.
दिल्लीची सीमा सचदेव मुंबईत फॅशन डिझायनिंगचा कोर्स करायला आली होती. याचदरम्यान तिची ओळख सोहेल खानशी झाली. या ओळखीचे रुपांतर पुढे प्रेमात झाले. मात्र, या दोघांच्या लग्नाला सीमाच्या घरुन तीव्र विरोध होता. त्यामुळेच सोहेलचा ‘प्यार किया तो डरना क्या’ हा पहिला सिनेमा प्रदर्शित झाला त्याच दिवशी दोघांनी आर्य समाज मंदिरात पळून जाऊन लग्न केले.
सोहेलने १९९७ मध्ये दिग्दर्शक म्हणून सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. ‘प्यार किया तो डरना क्या’ हा त्याचा पहिला दिग्दर्शित केलेला सिनेमा होता. सोहेल आणि सीमा मिळून एक एण्टरटेनमेन्ट कंपनी चालवतात. याशिवाय सीमाचे इतर अनेक व्यवसाय आहेत. सीमाचा स्वतःच्या नावाचा फॅशन ब्रॅण्ड आहे तसेच स्पा सेंटर्सही आहेत.
सोहेल नुकताच सलमान खानसोबत ‘ट्युबलाइट’ सिनेमात दिसला होता. सीमा आणि सोहेलला निर्वान खान आणि योहान खान ही दोन मुले आहेत. खान कुटुंबियांच्या कोणत्याही पार्टीमध्ये सोहेल आणि सीमा आवर्जुन उपस्थित असतात.