राजेश खन्ना आज आपल्यात नसले तरीही त्यांच्या अनोख्या अभिनय शैलीने नेहमीच अनेकांची मनं जिंकली. पंजाबमध्ये जन्मलेल्या जतिन खन्ना म्हणजेच राजेश खन्ना यांची चित्रपट विश्वाकडे आधीपासूनच ओढ होती. ‘आखरी खत’मधून त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. पण, शक्ती सामंता यांच्या ‘आराधना’ या चित्रपटाने राजेश खन्ना नावाच्या सुपरस्टारचा जन्म झाला. यानंतरच्या बऱ्याच चित्रपटांनी त्यांना यशाच्या शिखरावर पोहोचवलं.

राजेश खन्ना यांनी सलग १५ सुपरहिट चित्रपट देत एक नवा विक्रम चित्रपटसृष्टीत प्रस्थापित केला. त्यांच्या या चित्रपटांनी खऱ्या अर्थाने एक काळ गाजवला. विविध भूमिकांना न्याय देत रुपेरी पडद्यावर त्या भूमिका जिवंत करण्याच्या त्यांच्या या अंदाजाने अनेकांनाच भुरळ घातली होती.
अशा या अभिनेत्याचं खासगी आयुष्यसुद्धा बरंच रंजक होतं, सुरुवातीच्या दिवसांपासूनच अंजू महेंद्रू यांनी राजेश खन्ना यांची साथ दिली होती. त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चाही सर्वदूर पसरल्या होत्या. पण, कालांतराने डिंपल कपाडियासोबत राजेश खन्ना यांचं नाव जोडलं गेलं आणि अंजूसोबतच्या त्यांच्या नात्यात दुरावा आला.

वाचा : गोष्ट पहिल्या सुपरस्टारच्या पहिल्या प्रेयसीची…

अंजूसोबतच्या नात्यात दुरावा आल्यानंतर राजेश खन्ना यांच्या आयुष्यात तिची जागा भरुन काढण्यासाठी दुसऱ्याच मुलीची एण्ट्री झाली होती. ती मुलगी होती डिंपल कपाडिया. पाहताच क्षणी डिंपलच्या सौंदर्यावर भाळलेल्या या सुपरस्टारने तिच्याशी लग्नगाठ बांधली. त्यांचं हे नातंसुद्धा बरंच चर्चेचा विषय ठरलं. डिंपल कपाडियासोबत विवाहबद्ध झाल्यानंतर राजेश खन्ना यांनी चक्क त्यांच्या वरातीची वाट बदलली होती. मुख्य म्हणजे त्यांनी ठरलेल्या रस्त्यावरुन न जाता अंजू महेंद्रूच्या घराजवळून जाणारा रस्ता वरातीसाठी निवडला. हे करण्यामागे त्यांचा नेमका हेतू काय होता याविषयी तेच जाणत असावेत. पण, त्यांच्याविषयीच्या आठवणी सांगताना वरातीचा किस्सा सुद्धा आवर्जून सांगितला जातो.

Story img Loader