फेब्रुवारी महिन्यात अक्षय कुमारचा ‘पॅडमॅन’ आणि सिद्धार्थ मल्होत्राचा ‘अय्यारी’ या दोन बॉलिवूड चित्रपटांनी बॉक्स ऑफीस गाजवलं. तर मराठीतही ‘गुलाबजाम’ आणि ‘आम्ही दोघी’ असे दमदार चित्रपट पाहायला मिळाले. चित्रपट रसिकांसाठी मार्च महिनासुद्धा तितकाच खास ठरणार आहे. तर या महिन्यात प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांचा आढावा घेऊयात..

मराठी चित्रपट

व्हॉट्सअ‍प लग्न-

‘कॉफी आणि बरंच काही’ आणि ‘मि. अँड मिसेस सदाचारी’ या चित्रपटानंतर प्रार्थना बेहरे आणि वैभव तत्त्ववादी ही जोडी रसिकांची आवडती जोडी ठरली आहे. ‘व्हॉट्सअ‍प लग्न’ या आगामी मराठी चित्रपटाच्या निमित्ताने प्रार्थना आणि वैभव पुन्हा एकत्र दिसणार आहेत. १६ मार्च रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

हिंदी चित्रपट

रेड-

‘बादशाहो’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अजय देवगण आणि इलियाना डिक्रूझ ही जोडी पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. लखनऊमध्ये स्थानिक राजकीय नेत्यांची मुजोरी आणि काही करबुडव्यांची उदाहरणं घेत ‘रेड’ या चित्रपटाचं कथानक साकारण्यात आलं आहे. १९८१ मध्ये आयकर विभागाकडून देशातील सर्वात मोठी धाड कशा प्रकारे टाकण्यात आली होती, यावर ‘रेड’मधून प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. हा चित्रपट १६ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे.

बागी २-

अभिनेता टायगर श्रॉफ आणि अभिनेत्री दिशा पटानी यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘बागी २’ ३० मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘बेफीक्रे’ या अल्बमनंतर दिशा आणि टायगरचा एकत्र असा हा पहिलाच चित्रपट आहे.

हिचकी-

बरेच दिवस रुपेरी पडद्यापासून दूर राहिल्यानंतर अभिनेत्री राणी मुखर्जी आता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे. ‘यशराज फिल्म्स’ या निर्मिती संस्थेअंतर्गत साकारलेल्या ‘हिचकी’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. tourettes syndrome नावाच्या या आजाराच्या भोवती या चित्रपटाची कथा गुंफण्यात आली असून, ती मोठ्या कलात्मकपणे रुपेरी पडद्यांवर मांडण्यात आली आहे. २३ मार्च रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

हेट स्टोरी ४-

‘हेट स्टोरी’ सीरिजचा हा चौथा चित्रपट असून यामध्ये उर्वशी रौतेला आणि करण वाही यांच्या मुख्य भूमिका आहेत. ९ मार्च रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

दिल जंगली-

‘जुडवा २’नंतर आणखी एका हलक्याफुलक्या भूमिकेत अभिनेत्री तापसी पन्नू दिसणार आहे. ‘दिल जंगली’मध्ये तापसी आणि साकीब सलीम मुख्य भूमिकेत आहेत. हा रोमॅण्टिक कॉमेडी चित्रपट ९ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे.

३ स्टोरीज-

रिचा चड्ढा, शर्मन जोशी, पुलकीत सम्राट, रेणुका शहाणे यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका असलेला ‘३ स्टोरीज’ हा चित्रपटसुद्धा ९ मार्च रोजी प्रदर्शित होत आहे. तीन वेगवेगळ्या कथा या चित्रपटात दाखवल्या जाणार आहेत.