प्रत्येक महिन्याच्या सुरूवातीला चित्रपटप्रेमींना या महिन्यात कोणते चित्रपट प्रदर्शित होणार, याची साहजिकच उत्सुकता लागलेली असते. इंटरनेटच्या उपलब्धतेमुळे सध्या कोणताही सिनेमा प्रदर्शित होण्याच्या किमान सहा महिने आधी चित्रपटप्रेमींना त्याबद्दल माहित असते. त्यामुळे यंदाचा सप्टेंबर महिना आपल्यासाठी पर्वणी असल्याची चाहुल एव्हाना दर्दी प्रेक्षकांना लागलीच असेल. तरीही एकापाठोपाठ प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांच्या भाऊगर्दीत तुम्हाला पाहायचा असलेला एखादा चित्रपट मिस होण्याची शक्यता असते. त्यामुळेच सप्टेंबरमध्ये कोणते सिनेमे प्रदर्शित होणार आणि त्याची खासियत काय असेल, याचा घेतलेला हा आढावा.

८ सप्टेंबर २०१७
मराठी चित्रपट
तुला कळणार नाही-
स्वप्ना वाघमारे जोशी दिग्दर्शित आणि सुबोध भावे- सोनाली कुलकर्णी स्टारर हा सिनेमा पाहण्याची अनेकांमध्ये उत्सुकता दिसून येते.
बॉईज-
विशाल देवरुखकर दिग्दर्शित बॉईज सिनेमाचीही सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. पार्थ भालेराव, सुमंत शिंदे आणि प्रतिक लाड यांची मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमाच्या एका गाण्यात सनी लिओनीही आहे. सनीचे हे गाणे युट्युबवर व्हायरल झाले होते.

बॉलिवूड चित्रपट
डॅडी-
अर्जुन रामपालचा बहुप्रतिक्षित डॅडी सिनेमाची उत्सुकता मुंबईकरांमध्ये चांगलीच पाहायला मिळत आहे. कुख्यात गुंड अरुण गवळी याच्या आयुष्यावर हा सिनेमा बेतला आहे. स्वतः अर्जुनने या सिनेमाची निर्मिती केली असून अरुण गवळीचा गुंड ते राजकारणी हा प्रवास या सिनेमातून दाखवण्यात आला आहे.
पोस्टर बॉईज-
या सिनेमातून श्रेयस तळपदे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहे. मराठीमध्ये आलेल्या पोस्टर बॉईज या सिनेमाचा हा हिंदीतला रिमेक आहे. सनी देओल, बॉबी देओल आणि श्रेयसची यात महत्त्वपूर्ण भूमिका आहे.

१५-०९-१७
मराठी चित्रपट
उबुंटू-
उबुंटू सिनेमातून हरहुन्नरी पुष्कर श्रोत्रीची एक वेगळी झलक पाहायला मिळणार आहे. उबुंटू चित्रपटाची निर्मिती, दिग्दर्शन, कथा, संवाद अशा सर्व जबाबदाऱ्या पुष्करनेच पार पाडल्या आहेत. याशिवाय, या चित्रपटातील बालकलाकारांसोबतचे त्याचे ट्युनिंग कितपत जमले आहे, हे पाहण्यासाठी पुष्करचे चाहते नक्कीच उत्सुक असतील.
विठ्ठला शप्पथ-
चंद्रकांत पवार दिग्दर्शित हा सिनेमा उबुंटूसोबतच प्रदर्शित होत आहे.

बॉलिवूड चित्रपट
लखनऊ सेंट्रल-
फरहान अख्तर आणि डायना पेन्टी यांची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा याच दिवशी प्रदर्शित होत आहे. तुरुंगातून निघण्यासाठी फरहान कशापद्धतीने त्याचे साथीदार गोळ करतो आणि तिथून निसटण्याची योजना आखतो यावर सिनेमाची कथा बेतली आहे. अनेक तगडे कलाकार या सिनेमात दिसत आहेत.
सिमरन-
कंगना रणौतचा बहुचर्चित हा सिनेमा पाहण्याची उत्सुकता अनेकांमध्ये आहे. कंगनाचा सिनेमा येणार म्हणजे त्यात काही तरी नावीन्य असणार असं जणू समीकरणच झालं आहे. या चित्रपटात एका एनआरआय गुजराती मुलीच्या भूमिकेत ती दिसणार आहे. सिमरनची कथा सत्यघटनेवर आधारित आहे.

२२-०९-१७
बॉलिवूड चित्रपट
हसीना पारकर-
दाऊद इब्राहिमची बहिण हसीनाच्या आयुष्यावर या सिनेमाची कथा बेतली आहे. बॉलिवूडची डॉल श्रद्धा कपूर हसीनाची भूमिका साकारताना दिसणार आहे. या सिनेमासाठी श्रद्धाने खूप मेहनत घेतली असून तिच्यातला बदल ट्रेलर पाहताना नक्कीच जाणवतो. प्रेक्षकांच्या या सिनेमाकडून अनेक अपेक्षा आहेत. श्रद्धाचा हा सिनेमा या अपेक्षा पूर्ण करु शकतो की नाही हे तर २२ तारखेला कळेलच.
भूमी-
भूमी या चित्रपटातून संजय दत्त बॉलिवूडमध्ये पुनरागमन करत आहे. संजय आणि अदिती राव हैदरी यांची मुख्य भूमिका असणाऱ्या या सिनेमात शरद केळकरने नकारात्मक भूमिका साकारली आहे. बाप-लेकीचे नाते या चित्रपटाची सेंट्रल थीम आहे.
न्युटन-
राजकुमार राव याची मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमाकडेही प्रेक्षकांचा पाहण्याचा दृष्टीकोन सकारात्मक आहे. निवडणुकांच्या काळात राजकुमारला नक्षलवादी भागात पाठवले जाते. तिथल्या लोकांची परिस्थिती आणि निवडणुकांबााबत असलेली उदासीनता यावर हा सिनेमा भाष्य करतो. राजकुमारचा सिनेमा म्हटल्यावर त्यात उत्कृष्ट अभिनय आणि तगडी कथा हे असणारच. एक नवीन कथा आणि उत्कृष्ट अभिनय पाहण्यासाठी हा सिनेमा पाहावा असाच आहे.

२९-०९-१७
मराठी चित्रपट
बापजन्म-
निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित बापजन्म या सिनेमाचीही उत्सुकता अनेकांमध्ये पाहायला मिळते. सचिन खेडेकर यांची मुख्य भूमिका यात आहे. या सिनेमाच्या टीझरने अनेकांचे लक्ष वेधले आहे.
हलाल-
शिवाजी पाटील दिग्दर्शित या सिनेमात चिन्मय मांडलेकर, प्रितम कागणे, प्रियदर्शन जाधव यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. राजन खान यांची कथा असलेल्या या सिनेमाने अनेक पुरस्कारही मिळवले आहेत.

बॉलिवूड चित्रपट
जुडवा २-

वरुण धवन याचा जुडवा २ हा सिनेमा महिन्याच्या अखेरीस प्रदर्शित होत आहे. डेव्हिड धवन दिग्दर्शित हा सिनेमा सलमान खान याच्या ‘जुडवा’ या सिनेमाचा सीक्वल आहे. जॅकलिन फर्नांडिस आणि तापसी पन्नू यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका यात आहे. एक विनोदीपट म्हणून हा सिनेमा नक्कीच पाहता येईल.