अभिनेत्री उर्मिला मातोंडकर काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढविणार असल्याची चर्चा सुरु आहे. उर्मिला उत्तर मुंबई मतदारसंघातून निवडणूक लढणार असून तिच्या विरुद्ध भाजपाचे उमेदवार गोपाळ शेट्टी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. सध्या उर्मिलाच्या नावाची केवळ चर्चा असून उर्मिलाने अद्यापतरी या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. उत्तर मुंबई हा मतदारसंघ भाजपाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. त्यांच्या या बालेकिल्ल्यात उर्मिला निवडणूक लढविणार असल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

संजय निरुपम यांनी उत्तर मुंबईऐवजी उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा हट्ट धरला होता. त्यामुळे त्यांनी काँग्रेस अध्यक्षपदावर पाणी सोडत उत्तर पश्चिम उमेदवारी मिळविली.उत्तर मुंबईतून भाजपाविरोधात लढण्यासाठी काँग्रेसचे स्थानिक नेते फारसे उत्सुक नसल्यामुळे एखाद्या सेलिब्रिटीला मैदानात उतरविण्याची चर्चा काँग्रेसमध्ये सुरू होती. यासाठी काँग्रेसकडून अभिनेत्री नगमा, माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझहरुद्दीन, राज बब्बर, गोविंदाचा भाचा कृष्णा अभिषेक, अभिनेत्री शिल्पा शिंदे, आसावरी जोशी यांच्या नावाची चर्चा सुरु होती. मात्र काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांनी या कलाकारांना डावलत उर्मिलाच्या नावाला पसंती दिली. परंतु उर्मिलाच्या उमेदवारीबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यापासून राजकीय पक्षामधील हालचाली वेगाने वाढल्या आहेत. त्यातच काही सिनेकलाकारही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे. अभिनेत्री किरण खेर, परेश रावल, गुल पनाग, मनोज तिवारी, प्रकाश झा, संजय दत्त, सलमान खान, परेश रावल बॉलिवूडमधील हे दिग्गज कलाकार निवडणूक लढविणार असल्याची चर्चा रंगत आहे.

 

Story img Loader