मराठी आणि बॉलिवडू चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्याची छाप पाडणाऱ्या वैभव तत्वावादीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. महाराष्ट्राचा ‘मोस्ट डिझायरेबल मॅन ऑफ २०१८’ हा पुरस्कार त्याला मिळाला असून नुकतीच या पुरस्काराची घोषणा करण्यात आली.
आपल्या स्टाइल स्टेटमेन्टमुळे तरुणांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या वैभव तत्ववादीसोबत या स्पर्धेत ५० मॉडेल्स आणि अभिनेते सामिल झाले होते. या साऱ्या मॉडेल्स आणि अभिनेत्यांना मागे टाकून वैभवने महाराष्ट्राचा मोस्ट डिझायरेबल मॅन ऑफ २०१८ चा पुरस्कार मिळवला.
वैभव तत्वावादीचा एक बॉलिवडू चित्रपट सध्या येऊ घातलाय. ‘मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटात तो झळकणार आहे. सतत विविध भूमिकांमध्ये दिसणारा वैभव या चित्रपटातही एका वेगळ्या भूमिकेत दिसणार असल्याने त्याचे चाहते या चित्रपटच्या प्रतिक्षेत आहेत.
ऐतिहासिक भूमिकेत वैभवला आपण याआधीही पाहिलंय. या चित्रपटातही त्याची अशीच ऐतिहासिक भूमिका असून राणी लक्ष्मीबाईच्या सैन्यातील पुराण सिंग या सैनिकाच्या भूमिकेत वैभव आपल्याला दिसेल. या चित्रपटात अंकिता लोखंडेही त्याच्यासोबत पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करणार आहे. या चित्रपटात मुख्य भुमिकेत कंगणा राणावत असणार आहे. या चित्रपटाचं शुटींग सध्या जोरात सुरू असल्याचंही सांगण्यात येतंय.
पाच वर्षांपूर्वी वैभवने चित्रपट क्षेत्रात पदार्पण केलं. अगदी कमी वेळात वैभवने या क्षेत्रात आपलं वेगळं स्थान निर्माण केलंय. केवळ मराठीच नव्हे तर हिंदी चित्रपटसृष्टीतही त्याने आपल्या कामासाठी कौतुकाची थाप मिळवली आहे. ‘बाजीराव मस्तानी’ आणि ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ या दोन्ही चित्रपटातील त्याच्या भूमिकेचं रसिक प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केलंय. अशाच विविधांगी भूमिका साकारणारा वैभव आता महाराष्ट्राचा ‘मोस्ट डिझायरेबल मॅन ऑफ २०१८’ ठरल्याने त्याचे चाहतेही आनंदी झाले आहेत.