व्हॅलेंटाइन डे म्हणजे असा दिवस ज्याची अनेकजण आतुरतेने वाट पाहतात. अर्थात या अनेकजणांमध्ये वयाची, जाती, धर्माची, रंगवर्णाची अशी कोणतीही मर्यादा नसते, हेच खरं. प्रेमाचा उत्साह, रंग आणि एका वेगळ्याच जगाची सुखद अनुभूती देणारा हा दिवस म्हणजे व्हॅलेंटाइन डे. प्रत्येकाच्या जीवनात एकदातरी प्रेमाच्या आणाभाका घेतल्या जातात, वचनांची देवाणघेवाण होते आणि थोडेसे रुसवे फुगवेही असतातच. तुमच्या आमच्याप्रमाणेच कलाकारांच्या प्रेमाचेही असेच काहीसे किस्से आणि प्रेमाच्या आठवणी आहेत. सेलिब्रिटिंच्या याच काही सुरेख आणि अविस्मरणीय आठवणींचा ठेवा आम्ही घेऊन आलो आहोत, खास तुमच्यासाठी… व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने यंदा सेलिब्रिटिंच्या प्रेमाच्या गावी फेरफटका मारायलाच हवा… चला तर मग साजरा करूया उत्साह प्रेमाचा…
आमची लव्हस्टोरी म्हणजे… दोन वर्षांपूर्वी माझे पप्पा निवृत्त झाले. त्यावेळी आम्ही एक पार्टी दिली. माझ्या मानलेल्या भावांना त्यावेळी एक मुलगा खूप आवडला होता आणि तो माझ्यासाठी योग्य असल्याचं जाणवल्यानं त्यांनी माझ्या न कळत त्यालाही पार्टीला बोलावलं होतं. तो, त्याचे वडील, मामा पार्टीला आले होते. कोणीतरी मला बघायला येतयं, याची मला काहीच कल्पना नव्हती. मी नेहमीप्रमाणेच माझ्याच विचारात होते. माझे कुटुंब, मित्रमंडळी यांच्यामध्ये मी अगदी छानपणे रमले होते. मी त्याला अगदी ओझरतं पाहिलं आणि सहज हाय, हॅलो केलं. पुढे तर मी ही भेट विसरूनही गेले होते. असं कोणी पार्टीला आलं होतं, हे माझ्या लक्षातही नव्हतं. मग दोन दिवसांनी घराच्यांनी मला विचारलं, पार्टीला आलेला तो मुलगा तुला कसा वाटला. मी म्हंटल कुठला मुलगा? मग घरच्यांनी मला त्याची सगळी माहिती सांगितली. त्यावेळी मी लगचेच मला यात अजिबात रस नसल्याचे सांगून टाकले. आपण हा विषय इथेच बंद करूया, असेही मी म्हणून गेले. खरंतर त्यावेळी मी त्या मनःस्थितीत नव्हते. तेव्हा मला लग्न करण्याची इच्छाच नव्हती. त्यानंतर बहुतेक घरच्यांनी मुलाकडच्यांना माझा नकार कळवलाच नाही. आशू तर पहिल्या भेटीतच माझ्या प्रेमात पडला होता. मी काहीतरी उत्तर द्यावं.. होकार किंवा नकार कळवावा, असंच त्याला वाटत होते.
आमच्या दोघांमध्ये सूत जुळावे, यासाठी प्रयत्न करणारी एक व्यक्ती होती. पण योगायोगाने ती नेमकी त्यावेळी भारताबाहेर गेली होती. पुढचे तीन महिने आशूला कळेच ना असं का झालं. मग त्याने थोडेफार प्रयत्न केले. तो योग्य संधीची वाट पाहात राहिला. त्यानंतर पुन्हा एकदा योग आला. माझ्या घरच्यांनी म्हटलं, निदान एकदा तरी या मुलाला भेट नंतर वाटलं तर तू त्याला नकार दे. असंही तू याआधीही मुलांना नकार दिलाच आहेस.
आशूला फक्त एकदाच भेटेन अशी मी त्यावेळी आई-बाबांना धमकीच दिली होती. एका तासात भेटून परत यायचं असंच मी त्याला भेटायला जाताना ठरवलं होतं. पण पहिल्याच भेटीत आम्ही तब्बल पाच तास गप्पा मारल्या. पहिल्याच भेटीत त्यानं लग्नाच्या निर्णयाचा बॉल माझ्या कोर्टात टाकला. आपल्याला काहीच घाई नाहीये. तुला पाचव्या भेटीत सांगण्यापेक्षा मी पहिल्याच भेटीत सांगतो की, तू मला फार आवडली आहेस. मला तुझ्याशी लग्न करायचंय, असं तो म्हणाला. पण ह्याला इतक्या पटकन मी कशी काय आवडले, काय बघितलं यानं माझ्यात, असा विचार सतत माझ्या मनात घोळू लागला. त्यावर त्याचं उत्तर होतं, मी त्या पार्टीत सगळं काही बघितलंय. तू कशी आहेस, तू मोठ्यांशी आणि लहानांशी कशी वागतेस, हे अनुभवलंय. एक व्यक्ती म्हणून तू कशी आहेस हे मला त्याच दिवशी समजलं होतं. त्याने मला होकार किंवा नकार कळवायला सांगितला…. अखेर मी त्याला होकार दिला. आमच्या भेटीच्या सात-आठ महिन्यांनंतर आम्ही लग्नही केलं.
(छाया सौजन्य: मयुरी देशमुख फेसबुक)