‘भारत’ चित्रपटानंतर अभिनेता सलमान खान आता ‘दबंग ३’ चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी सज्ज झाला आहे. ‘दबंग ३’ या चित्रपटात सलमान दोन वेगवेगळ्या भूमिका साकारणार आहे. सध्या या चित्रपटाचे चित्रीकरण मुंबईतील मेहबूब या स्टूडिओमध्ये सुरु आहे. दरम्यान या चित्रपटातील आयमट सॉंग ‘मुन्ना बदनमा हुआ’च्या जोरदार चर्चा सुरु असून या सॉंगमध्ये कोणती अभिनेत्री झळकणार याचे देखील अनुमान लावण्यात येत होते.
गेल्या काही दिवसांपासून ‘मुन्ना बदनमा हुआ’ या आयटम सॉंगसाठी अभिनेत्री करिना कपूर खान, मौनी रॉय इत्यादी अभिनेत्रींची चर्चा सुरु होती. पण आता ‘टाईम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार या सॉंगमध्ये ‘लव्हयात्री’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री वरिना हुसेन दिसणार असल्याचे म्हटले आहे. तसेच या सॉंगची कोरोग्राफी वैभवी मर्चंड करत आहे. तर साजीद-वाजीद यांनी या सॉंगला संगीतबद्ध केले आहे.
प्रभू देवा या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. ‘दंबग ३’ हा प्रिक्वल असून यात चुलबूल पांडेची कौटुंबिक पार्श्वभूमी दाखवण्यात येईल अशी चर्चा आहे तर दुसरीकडे हा चित्रपट नोएडामधल्या एका पोलीस अधिकाऱ्याच्या जीवनातील सत्य घटनांवर आधारित असल्याचेही म्हटले जात आहे. मात्र सलमानने याबद्दल बोलण्यास नकार दिला आहे. या चित्रपटाची कथा सध्या गुलदस्त्यातच राहू दे असे सलमानने म्हटले आहे.