मुंबई पोलिसांनी अभिनेता वरुण धवनला रस्त्यात अनोख्या पद्धतीने सेल्फी काढल्याबद्दल चांगलेच फटकारले आहे. यासोबतच वरुणला ई- चलनही पाठवले. पोलिसांनी फटकारल्यानंतर वरुणने सोशल मीडियावर मुंबई पोलिसांची माफीही मागितली. त्याचे झाले असे की, वरुणने रस्त्यात एका चाहतीसोबत सेल्फी काढला. वरुणने त्याच्या कारच्या खिडकीतून तर त्याच्या चाहतीने रिक्षातून डोके बाहेर काढले. चाहतीला वरुणने अगदी मनाजोगता सेल्फी दिला. पण मुंबई पेलिसांनी त्याचा एक फोटो शेअर करत म्हटले की, 'वरुण धवन असे साहस मोठ्या पडद्यावर चांगले वाटते, पण मुंबईच्या रस्त्यांवर नाही. तुम्ही तुमची, तुमच्या चाहतीची आणि आणखी काही लोकांचे आयुष्य धोक्यात घातले. तुमच्यासारख्या जबाबदार मुंबईकर आणि यूथ आयकॉनकडून याहून चांगल्या वागणुकीची अपेक्षा आहे. ई-चलन तुमच्या घरी पोहोचेल, असे पुन्हा झाल्यास आम्ही अजून कडक कारवाई करु.' वरुणने मागितली माफी- वरुणनेही मुंबई पोलिसांच्या ट्विटला उत्तर देत म्हटले की, 'मी जे केलं त्याची मी माफी मागतो. आम्ही सिग्नल लागला होता म्हणून थांबलो होतो. आम्हा दोघांचेही वाहन एका जागी उभे होते. मला चाहत्यांच्या भावना दुखवायच्या नव्हत्या. पण यापुढे मी सुरक्षेबाबत अधिक सतर्क राहीन आणि अशी वागणूक पुन्हा होणार नाही याची खबरदारी घेईन.' My apologies Our cars weren’t moving since we were at a traffic signal and I didn’t want to hurt the sentiment of a fan but next time I’ll keep safety in mind and won’t encourage this. — Varun Dhawan (@Varun_dvn) November 23, 2017 सध्या वरुण ऑक्टोबर सिनेमाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. सिनेमाचे बहुतांश चित्रीकरण दिल्लीमध्येच होणार आहे. बनिता संधू या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. पुढच्या वर्षी एप्रिल महिन्यात हा सिनेमा प्रदर्शित होईल.