‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या अभिनेता वरुण धवनने हिंदी चित्रपटसृष्टीत एक वेगळीच ओळख निर्माण केली आणि चाहतावर्ग तयार केला. ‘जुडवा २’ आणि ‘बद्रिनाथ की दुल्हनिया’ या सुपरहिट चित्रपटांनी बी टाऊन गाजवणाऱ्या वरुणच्या लग्नाच्या बातमीनेही आता जोर धरला आहे. लग्नाच्या बेडीत अडकणाऱ्या काही कलाकारांच्या यादीत वरुणचीही वर्णी लागण्याची चिन्हं दिसत आहेत. कारण, यावर्षी तो बोहल्यावर चढणार का असा प्रश्न विचारण्यात आला असता त्याने सकारात्मक उत्तर दिले.

वरुण धवन त्याची प्रेयसी नताशा दलाल हिच्यासोबत येत्या काही काळात लग्न करणार असल्याचे म्हटले जात आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला की, ‘खरंच, मला यावर्षी लग्न करायला आवडेल, पण माझे आईवडील कशी प्रतिक्रिया देतील हे माहित नाही. पंजाबी असल्याने पारंपरिक पद्धतीने लग्नसोहळा त्यांना नक्कीच आवडेल. कधी ना कधी हा निर्णय प्रत्येकालाच घ्यायचा असतो, पण सध्या तरी लग्न हेच माझे ध्येय नाही.’

VIDEO : मित्रांना बार्बेक्यू ट्रिट देत शेफ सचिनने मारला मास्टर स्ट्रोक

नताशा दलाल या बालमैत्रिणीसोबत वरुणला अनेक कार्यक्रमांदरम्यान एकत्र पाहण्यात आले होते. हे दोघेही बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत आहेत. नताशा व्यवसायाने इंटेरिअर डिझायनर आहे. वरुणने प्रसारमाध्यमांसमोर नताशासोबतच्या त्याच्या नात्याची कोणतीही कबुली दिली नसली तरीही त्याने हे नाते नाकारलेही नाहीये.

जाणून घ्या, टायगर श्रॉफचा ‘फिटनेस फंडा’

वरुणने नुकतेच नवीन घर घेतले असून तेथे तो राहत आहे. लग्नाचा काही विचार करण्यापूर्वी मला माझ्या आयुष्याच्या या काळाचा मनमुराद आनंद लुटायचा आहे, असेही त्याने स्पष्ट केले. सध्या वरुण त्याच्या आगामी ‘सुई धागा’ या चित्रपटाच्या तयारीला लागला आहे.