अभिनेत्री करिना कपूरच्या बहुप्रतिक्षित ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. करिना आणि तिची गर्ल्स गँग म्हणजेच सोनम कपूर, स्वरा भास्कर आणि शिखा तल्सानिया यांची बोल्ड मस्ती या ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. लव्ह, लग्न आणि लोचामध्ये अडकलेल्या या चौघींच्या आयुष्याची मजेशीर कहाणी यात मांडण्यात आली आहे.

एकता कपूर आणि सोनमची बहिण रिया कपूर निर्मित या चित्रपटाचं दिग्दर्शन शशांक घोषने केलं आहे. जवळपास तीन मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये चित्रपटाच्या कथानकाची बऱ्यापैकी ओळख होते. कालिंदी पुरी असं करिनाच्या भूमिकेचं नाव असून ऋषभ म्हणजेच सुमित व्यासशी तिच्या लग्नाची तयारी सुरू असते. मात्र, लग्नापूर्वी तिच्या मनात उडालेल्या गोंधळाचं चित्रण यात करण्यात आलं आहे. करिना आणि तिच्या तीन मैत्रिणींचं हिंडणं, फिरणं, शॉपिंग करणं, मनमोकळ्या गप्पा मारणं आणि त्यांच्या वैयक्तिक आयु्ष्यात प्रेम आणि  लग्नावरून निर्माण झालेला गोंधळ यात पाहायला मिळतो.

वाचा : ब्रिटनच्या शाही विवाहसोहळ्याला ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीची उपस्थिती

तैमुरच्या जन्मानंतर करिनाचा हा पहिलाच चित्रपट आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांना या कमबॅकची बरीच प्रतीक्षा होती. चित्रपटाच्या पोस्टर्सनाही प्रेक्षकांचा उत्सुर्त प्रतिसाद मिळाला होता. ‘उडता पंजाब’नंतर करिना या चित्रपटात झळकणार आहे आणि त्यासाठी तिनं बरीच मेहनतदेखील घेतली आहे. तिच्या लूकमधील बदल या ट्रेलरमध्ये सहज पाहायला मिळतो. बोल्ड संवाद आणि हटके कथानक घेऊन ‘वीरे दी वेडिंग’ हा चित्रपट येत्या १ जून रोजी प्रदर्शित होणार आहे.