ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे आज ७ जुलै रोजी निधन झाले आहे. वयाच्या ९८व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे दिलीप कुमार यांना हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनानंतर बॉलिवूडमधून शोक व्यक्त केला जात आहे. अनेक सेलिब्रिटी दिलीप कुमार यांना सोशल मीडिया पोस्टद्वारे श्रद्धांजली वाहत आहेत.

बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांनी ट्वीट करत दिलीप कुमार यांना श्रद्धांजली वाहिली आहे. “जेव्हा भारतीय सिनेमाचा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा तो ‘दिलीप कुमार यांच्या आधी आणि दिलीपकुमार यांच्यानंतर’ असा लिहिला जाईल. त्यांच्या आत्म्यास शांती मिळो” या आशयाचे ट्वीट करत अमिताभ बच्चन यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

अमिताभ यांच्या पाठोपाठ अभिनेता अक्षय कुमार, सोनू सूद, जावेद जाफरी आणि इतर काही कलाकारांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे श्रद्धांजली वाहिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दिलीप कुमार यांना श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे जून महिन्यात रुग्णालयात दाखल करावे लागले होते. बायलॅटरल प्लुरल इफ्युजनमुळे त्यांना आयसीयूमध्ये हलवण्यात आले होते. त्यावेळी सायरा बानो यांनी दिलीप कुमार यांचा रुग्णालयातील फोटोदेखील शेअर करत त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती दिली होती. उपचारानंतर पाच दिवसांनी दिलीप कुमार यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करावे लागले होते. आज सकाळी ७.३० वाजता दिलीप कुमार यांनी अखेरचा श्वास घेतला.