‘नवरे सगळे गाढव’ चित्रपटात त्यांच्या वाटय़ाला अगदी छोटा प्रसंग आला होता. पण तो प्रसंगही त्यांनी आपल्या अभिनयाने व खास शैलीत असा काही रंगवला की विनोदसम्राट साक्षात शरद तळवलकरही त्यांच्याकडे एक क्षण पाहात राहिले आणि त्यांनी शाबासकीची थाप त्या अभिनेत्याच्या पाठीवर मारली. तळवलकर यांच्याकडून कौतुकाची थाप मिळविलेले ते ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर आजच्या ‘पुनर्भेट’चे मानकरी आहेत.
‘पुनर्भेट’च्या निमित्ताने गप्पांच्या ओघात नांदलस्कर यांनी वरील किस्सा सांगितला. त्या आठवणीत रमताना ते म्हणाले, ‘नवरे सगळे गाढव’ हा चित्रपट जवळपास पूर्ण झाला होता. शरद तळवलकर, पद्मा चव्हाण अशी मोठी कलाकार मंडळी त्यात होती. त्या चित्रपटात मला अगदी छोटीशी म्हटली तर नगण्य भूमिका मिळाली. त्यात एक प्रसंग असा होता. तळवलकर यांचे मयताच्या सामान विक्रीचे दुकान असते. मी त्या दुकानात जातो. तळवलकर ‘हं, मयताचे आडनाव काय?’ असा प्रश्न मला करतात. मी त्यांना ‘खरे’ असे उत्तर देतो. त्या वेळी मी ‘पण खऱ्याला तर मरण नसतं ना’ असं एक पदरचं वाक्य टाकलं आणि एक क्षणभर तळवलकर माझ्याकडे पाहात राहिले. त्यांनी त्यांच्या शैलीत मला उत्तर दिले आणि तो प्रसंग तिथेच संपला. माझ्या त्या पदरच्या वाक्याने शरद तळवलकर खूश झाले आणि त्यांनी मला शाबासकी दिली. माझ्या अभिनय प्रवासातील तो पहिला चित्रपट होता. तळवलकर यांच्यासारख्या दिग्गज अभिनेत्याकडून माझे झालेले कौतुक मी अद्यापही विसरलेलो नाही, माझ्यासाठी तो आशीर्वाद आहे..
किशोर नांदलस्कर यांचे मूळ गाव खारेपाटण तालुक्यातील शेजवली. त्यांचा जन्म मुंबईचाच. मुंबईत लॅमिंग्टन रस्ता, नागपाडा, घाटकोपर आणि अन्य काही भागात त्यांचे लहानपण गेले. ‘न्यू इरा हायस्कूल’ आणि ‘युनियन हायस्कूल’ येथे त्यांचं शालेय शिक्षण झालं. किशोर नांदलस्कर यांना अभिनयाचा वारसा त्यांचे वडील खंडेराव यांच्याकडून मिळाला होता. त्या काळात त्यांनी नाटकांमधून स्त्री भूमिका केल्या होत्या. केशवराव दाते यांच्या नाटक कंपनीत तसेच अन्य काही नाटकांमधून त्यांनी काम केले होते. पुढे अभिनयाला रामराम करून खंडेराव यांनी काही काळ ‘ज्युपीटर’ गिरणीत नोकरी केली. गिरणीत काम करत असतानाच ते आंतरगिरणी तसेच कामगार नाटय़स्पर्धेतही नाटकं बसवायचे. त्या वातावरणातच नांदलस्कर लहानाचे मोठे झाले. त्यामुळे अभिनयाचं वेड त्यांना लागलेलं होतंच.
एक दिवस त्यांनी वडिलांना मलाही नाटकात काम करायचे आहे, असं सांगितलं. वडिलांनीही होकार दिला आणि १९६०-६१ च्या सुमारास रंगभूमीवर सादर झालेल्या ‘आमराई’ नाटकात त्यांना काम करण्याची संधी मिळाली. ती आठवण सांगताना ते म्हणाले, माझी अगदीच नगण्य भूमिका होती. माझ्या वाटय़ाला जो प्रसंग आला होता त्यात मला फक्त ‘बाप्पा’ अशी हाक मारायची होती. घाटकोपर येथे एका वाडीत ते नाटक झाले. मी रंगमंचावर प्रवेश केला आणि मला दरदरून घाम फुटला. ‘बाप्पा’ हा एक शब्दही माझ्या तोंडून निघाला नाही. सहकलाकार अरे बोल, बोल असं सांगत होते. प्रेक्षकांमधूनही हुर्यो उडवली गेली. तो माझ्यासाठी एक ‘धडा’ ठरला. अभिनय हा वाटतो तितको सोपा नाही हे मला कळलं. मी त्या वेळी जरी नापास झालो असलो तरी पुढे काम करत करत, अनुभवातून शिकत गेलो. ‘मुंबई मराठी साहित्य संघा’त सादर होणारी अनेक नाटकं, त्यातील कलाकारांचा अभिनय पाहिला. त्यातून जे मिळत गेलं ते टिपलं आणि माझ्यातील अभिनेता घडवत गेलो. त्याच काळात ‘कलाकिरण’ ही संस्था काढली. वसंत जाधव यांनी लिहिलेली छोटी छोटी नाटकं केली. घाटकोपर येथील ‘सवरेदय रुग्णालया’च्या आवारात रुग्णांसाठी श्रीराम इंदूलकर यांच्या सहकार्याने काही नाटकंकेली. त्याच काळात एका कंपनीत काही वर्षे नोकरीही केली. नोकरी सांभाळून नाटक सुरूच ठेवलं होतं. लोकनाटय़ लेखक शरद निफाडकर यांच्या ‘विठ्ठल फरारी’, ‘नथीतून मारला तीर’, ‘सुंदरा मनामध्ये भरली’ आदी नाटकं केली. त्याच सुमारास म्हणजे १९८० मध्ये दूरदर्शनच्या ‘गजरा’, ‘नाटक’ आणि अन्य कार्यक्रमांतून सहभागी झालो होतो. यातून हळूहळू माझं नाव झालं, लोक ओळखायला लागले.
नांदलस्कर यांनी आत्तापर्यंत सुमारे ४० नाटके, २५ हून अधिक मराठी व हिंदूी चित्रपट आणि २० हून अधिक मालिकांमधून काम केले आहे. ‘नाना करते प्यार’ हे त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवर काम केलेले शेवटचे नाटक. ‘सारे सज्जन’, ‘शेजारी शेजारी’, ‘हळद रुसली कुंकू हसले’ आणि इतर काही चित्रपट त्यांच्या नावावर जमा आहेत. ‘विच्छा माझी पुरी करा’ हे नाटक नव्याने पुन्हा रंगभूमीवर सादर झालं. त्याचं दिग्दर्शन पुरुषोत्तम बेर्डे यांचं होतं. या नाटकातील ‘राजा’ची भूमिका तसेच दिलीप प्रभावळकर यांनी लोकप्रिय केलेले ‘वासूची सासू’ हे नाटकही नव्याने रंगभूमीवर सादर झालं. यात प्रभावळकर यांची भूमिका नांदलस्कर यांना साकारायची संधी मिळाली. दोन्ही भूमिका नांदलस्कर यांनी खास त्यांच्या शैलीत सादर केल्या. व्यावसायिक रंगभूमीवर नांदलस्कर यांनी ‘चल आटप लवकर’, ‘भ्रमाचा भोपळा’, ‘पाहुणा’, ‘श्रीमान श्रीमती’, ‘भोळे डॅम्बीस’, ‘वन रूम किचन’ आदी नाटकांमधून प्रेक्षकांना पोट धरून हसवलं.
महेश मांजरेकर यांच्या ‘वास्तव’ चित्रपटातून नांदलस्कर यांचा बॉलीवूडच्या रुपेरी पडद्यावर प्रवेश झाला. ‘जिस देश में गंगा रहता है’ (गोविंदा), ‘तेरा मेरा साथ है’ (अजय देवगण), ‘खाकी’ (अमिताभ बच्चन) यांच्याबरोबर काम करायची संधी त्यांना मिळाली. ‘चाल जाए पर वचन न जाए’, ‘ये तेरा घर ये मेरा घर’, ‘हलचल’, ‘सिंघम’ या हिंदी चित्रपटांतही त्यांची भूमिका होती. इतकी वर्षे काम करूनही छोटय़ा छोटय़ा भूमिकाच मिळत गेल्या. लक्षात राहील अशी मोठी आणि विशेष भूमिका साकारायची संधी मिळाली नाही, याची कधी खंत वाटते का?, या प्रश्नाला उत्तर देताना नांदलस्कर यांनी सांगितलं, माझ्या बरोबर काम कोण करतंय, माझी भूमिका किती आहे याचा विचार मी कधीही केला नाही. कोणतीही भूूमिका ही लहान नसते. ‘वन रूम किचन’मधील ‘पितळे मामा’, ‘पाहुणा’मधील ‘नेने’, ‘विच्छा माझी पुरी करा’मधील ‘राजा’असो किंवा आणखीही अन्य भूमिका असोत. माझ्या वाटय़ाला आलेली प्रत्येक भूमिका मी जीव ओतून केली. त्यामुळे लांबी-रुंदीच्या दृष्टीने त्या फार मोठय़ा नसल्या तरीही प्रत्येक भूमिकेवर मी माझी छाप पाडली, माझ्या अभिनय शैलीत ती साकारली आणि म्हणूनच आजही मी प्रेक्षकांच्या लक्षात आहे. ‘हुंटाश’ (यात माझी एकदम वेगळी भूमिका आहे), ‘मिस यू मिस’, ‘कंदीलगाव’ हे माझे आगामी चित्रपट आहेत.
पत्नी लक्ष्मी आणि तीन विवाहित पुत्र, सुना, नातवंडे असा त्यांचा परिवार. गेल्या वर्षी अचानक दम लागणे, छातीत धडधडणे असा शारीरिक त्रास त्यांना सुरू झाला. नाटक, चित्रपट आणि मालिकांमध्ये व्यग्र असलेल्या नांदलस्कर यांनी त्याकडे सुरुवातीला दुर्लक्ष केले. पण असह्य़ झाले तेव्हा डॉक्टरांकडे जाण्यावाचून पर्यायच नव्हता. वैद्यकीय तपासण्यातून हृदयविकार, मधुमेह असल्याचे समोर आले. यातून माझी ‘बायपास’ झाली. ‘पेसमेकर’ बसवला गेला. हिंडणे-फिरणे, काम करणे यावर बंधनं आली. त्यामुळे सध्या काही काळ विश्रांती घेतली आहे. या अल्पविरामानंतर पुन्हा एकदा अभिनयाची नवी खेळी खेळण्यास आपण उत्सुक असल्याचं नांदलस्कर म्हणाले. माझा स्वभाव काहीसा बुजरा आणि भिडस्त असल्याने अभिनय कारकीर्दीत त्याचा थोडासा तोटाही झाल्याचे नांदलस्कर यांनी मोकळेपणाने कबूल केले.
शेखर जोशी, shekhar.joshi@expressindia.com