हिंदी सिनेसृष्टीतील ‘ट्रॅजेडी किंग’ अशी ओळख असलेले दिग्गज अभिनेते दिलीप कुमार याचं निधन झालंय. वयाच्या ९८ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली.सकाळी ७.३० वाजता हिंदूजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दिलीप कुमार यांनी त्यांच्या करिअरमध्ये ६० सिनेमा केले. मात्र त्यांच्या प्रत्येक सिनेमाने बॉलिवूडमध्ये अनोखी छाप सोडली. त्यांच्या अनेक भूमिका आजवर अजरामर ठरल्या आहेत. दिलीप कुमार यांचा जन्म ११ डिसेंबर १९२२ साली पाकिस्तानातील पेशावरमध्ये झाला होता.
अनेकांना कदाचित ठाऊक नसेल मात्र दिलीप कुमार यांचं खरं नाव युसूफ सरवर खान असं होतं. दिलीप कुमार यांनी त्यांच्या ‘द सबस्टांस अॅण्ड द शॅडो’ या पुस्तकात अनेक गोष्टींचा उलगडा केला आहे. यात त्यांनी ते यूसुफ सरवर खानचे दिलीप कुमार कसे झाले याचा किस्सा देखील सांगितला आहे.
सिनेसृष्टीत येण्याआधी दिलीप कुमार आपल्या वडिलांचा व्यवसाय सांभाळत होते. ब्रिटीश कॅम्पमध्ये तयार होणाऱ्या खाटांच्या सप्लाईसाठी ते दररोज मुंबईतील दादरमध्ये जात. एकेदिवशी चर्चेगेट स्थानकावर दिलीप कुमार ट्रेनची वाट पाहत उभे होते. यावेळी त्यांची गाठ एका ओळखीतील मानसशास्त्रज्ञ असलेल्या डॉक्टरांशी झाली. डॉक्टर मसानी त्यावेळी ‘बॉम्बे टॉकीज’च्या मालकिण देविका राणी यांना भेटण्यासाठी जात होते. त्यांनी दिलीप कुमार यांनाही सोबत नेलं. या भेटीने दिलीप कुमार यांचं आयुष्य बदलणार यांची कदाचित तेव्हा त्यांना कल्पना देखील नव्हती.
एका भेटीने बदललं दिलीप कुमार यांचं आयुष्य
जेव्हा दिलीप कुमार देविका राणी यांच्या भेटीला गेले तेव्हा डॉक्टर मसानी यांनी त्यांचा परिचय करून दिला. यावेळी देविका राणी यांनी दिलीप कुमार यांना उर्दू येते का असा सवाल विचारला होता. यावर दिली कुमार यांनी उर्दू येते असं उत्तर देताच देविका राणी यांनी त्यांना अभिनयासाठी ऑफर दिली होती.”अभिनेता बनण्याची इच्छा आहे का?” असा प्रश्न विचारत देविका राणी यांनी दिलीप कुमार यांना त्याकाळी साडे बाराशे रुपये (1250) एवढी फी देखील ऑफर केली होती. मात्र यावेळी दिलीप कुमार यांना अभिनयाची जाण नसल्याने ते गोंधळात पडले.
देविका राणी दिलीप कुमार यांना म्हणाल्या, “मला एका तरुण, चांगला दिसणारा आणि सुशिक्षित कलाकाराची गरज आहे. मला तुझ्यात एका उत्तम कलाकाची योग्यता दिसते.” यानंतर १२५० रुपये मासिक पगार पाहता दिलीप कुमार यांनी ही ऑफर स्विकारली. त्यानंतर ते ‘बॉम्बे टॉकिज’साठी काम करू लागले. दररोज ते १० ते ६ वाजेरपर्यंत स्टुडिओत अभिनयाचे बारकावे समजून घेत.
असे झाले यूसुफ खानचे दिलीप कुमार
दिपील कुमार यांनी आपल्या पुस्तकात पुढे नावाचा उल्लेख केलाय. देविका रानी दिलीप कुमार यांना म्हणाल्या, “मला लवकरात लवकर कलाकारांना लॉन्च करायचं आहे. या रुपेरी पडद्यासाठी तुला एक पडद्यावरचं नावदेखील हवं. असं नाव ज्याने प्रेक्षक तुला ओळखतील आणि प्रेक्षक तुझ्या रोमॅण्टिक इमेजला तुझ्या नावासोबत जोडतील. माझ्या मते दिलीप कुमार हे चांगलं नावं आहे. जेव्हा मी तुमच्या नावाबद्दल विचार करत होते तेव्हा मला हे नाव सुचलं. तुम्हाला हे नाव कसं वाटलं?” असं प्रश्न देविका राणी यांनी दिलीप कुमार यांना विचारला.
देविका रानीच्या या प्रश्नाने दिलीप कुमार कोड्यात पडले. ते नाव बदलण्यासाठी तयार नव्हते. नाव बदलणं खरच गरजेचं आहे का? असा सवाल त्यांनी देविका राणी यांना केला होता. यावर “मी खूप विचारपूर्वक हा निर्णय घेतला आहे. तुम्हाला एक स्क्रीनवरील नाव असणं गरजेचं आहे.” असं देविका राणी म्हणाल्या. त्यानंतर शशिधर मुखर्जी यांनी समजूत काढल्यानंतर दिलीप कुमार नाव बदलण्यासाठी तयार झाले. अखेर ते युसूफ सरवर खानवरून दिलीप कुमार झाले आणि याच नावाने त्यांनी हिंदी सिनेसृष्टीत राज्य केलं.
दिलीप कुमार यांनी केवल चार आकडी म्हणजेच तब्बल साडेबाराशे रुपये पगार पाहून अभिनय करण्यासाठी होकार दिला होता. असा उल्लेख त्यांच्या पुस्तकात केला आहे. याशिवाय सुरुवातील दिलीप कुमार यांचं अभिनय क्षेत्रात काम करणं देखील त्यांच्या वडिलांना पसंतं नव्हत.