युट्यूब वाहिन्यांच्या या दिवसांमध्ये बहुचर्चित ‘एआयबी’ या युट्यूब वाहिनीने एक नवा व्हिडिओ प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. महिलांवर होणारा अत्याचार आणि महिलांचा छळ या महत्त्वाच्या मुद्द्यांना चित्रपटसृष्टीतूनच कशा प्रकारे खतपाणी घालण्यात आले आहे यावर हा व्हिडिओ भाष्य करतना दिसतोय. अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री रिचा चड्डा यांनी या व्हिडिओमध्ये काम केले आहे. या दोन्ही कलाकारांच्या हटके अंदाजामध्ये ‘हरॅसमेंट थ्रू द एजेस’ या व्हिडिओचे चित्रीकरण करण्यात आले आहे.
एआयबी युट्यूब चॅनल आणि या कलाकारांच्या एकत्रिकरणाने हा व्हिडिओ पूर्णत्वास नेण्यात आला आहे. बऱ्याच वर्षांसापून चालत आलेलं एक सत्य विनोदी पण, तितक्याच प्रत्ययकारीपणे या व्हिडिओतून मांडण्यात आले आहे. हा व्हिडिओ पाहतानाच प्रेक्षकांना जितके खळखळून हसायला येते तितकेच महिलांचा होणारा छळ आणि त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराविषयी विचार करायला हा व्हिडिओ भाग पाडतो. शम्मी कपूरच्या काळापासून ते अगदी हल्ली हल्लीच्या वरुण धवनच्या चित्रपट गीतांचा आधार घेत हा व्हिडिओ साकारण्यात आला आहे. चित्रपटगीतांचा आधार घेत महिलांविषयी पुरुषांच्या मनात कितपत आदर होता हे मांडण्यासाठी बॉलिवूडचाच आधार घेण्यात आला आहे.
या व्हिडिओतून त्या त्या कलाकारांना दुखावण्याचा काहीही हेतू नसून अवघ्या काही घटकांवरच चित्रपटांमध्ये जास्त भर दिला जाण्याच्या वृत्तीला या व्हिडिओतून अधोरिखित करण्यात आले आहे. विकी आणि रिचाने अत्यंत प्रभावीपणे काम करत या व्हिडिओद्वारे एक महत्त्वाचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे. १९६० च्या दशकापासून थेट सध्याच्या दिवसांपर्यंतच्या चित्रपटांचा आधार घेत बनवण्यात आलेला ‘हरॅसमेंट थ्रू द एजेस’ हा व्हिडिओ सध्या नेटिझन्समध्ये चांगलाच गाजतोय. त्यामुळे महिलांचा विनाकारण पाठलाग करणे, त्यांचा छळ करणे, त्यांच्यावर अत्याचार करणे या सर्व दुष्कृत्यांवर भाष्य करणारा हा व्हिडिओ सध्या अनेकांची दाद मिळवत आहे.