जवळपास महिनाभरापूर्वी निर्माता-दिग्दर्शक करण जोहरच्या घरातील पार्टीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ पाहून करणच्या घरी बॉलिवूड सेलिब्रिटी ड्रग्ज पार्टी करत असल्याचा आरोप झाला होता. यावर नंतर करणनेही स्पष्टीकरण दिलं असलं तरी नेटकऱ्यांच्या टीकांचा परिणाम पार्टीला उपस्थित असलेल्या प्रत्येक कलाकारावर झाला आहे. अभिनेता विकी कौशलने नुकतंच या प्रकरणावर मौन सोडलं आहे. त्या व्हिडीओत विकीसुद्धा दिसत होता आणि तो ड्रग्जच्या नशेत असल्यासारखा दिसत असल्याचा अंदाज अनेकांनी बांधला होता.
‘मिड डे’ला दिलेल्या मुलाखतीत विकी म्हणाला, ”आम्हा सर्व कलाकारांची ती सर्वसामान्य पार्टी होती. त्याच्या काही दिवसांपूर्वीच मला डेंग्यू झाला होता. त्यातून बरा होत होतो आणि पार्टीनंतर लगेच मी सैन्यातील जवानांची भेट घेण्यासाठी अरुणाचल प्रदेशला गेलो होतो. तीन-चार दिवस तिथे होतो आणि तिथे मोबाइल फोनला अजिबात नेटवर्क नव्हता. करणने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर त्यावरून इतका सगळा वाद निर्माण झाला हे मला माहितसुद्धा नव्हतं. त्या तीन-चार दिवसांत माझ्यावर ‘चर्सी’चा ठपका ठेवला जाणार याची काडीमात्र कल्पना नव्हती. मी जेव्हा घरी आलो तेव्हा माझ्या आई-वडिलांना त्या व्हिडीओबद्दल माहीत होतं. सर्व बातम्या ते पाहत होते पण त्यांनी मला एक प्रश्नसुद्धा विचारला नव्हता. घरी आल्यावर मी माझ्या रुममध्ये गेलो आणि झोपण्यापूर्वी सहज ट्विटर चेक करत होतो. त्यावेळी मला या सर्व वादाबद्दल समजलं आणि आश्चर्याचा धक्काच बसला. बाहेर येऊन आई-वडिलांना याबद्दल विचारलं की हे तुम्ही पाहिलात का, त्यावर ते फक्त माझ्याकडे पाहून हसले आणि म्हणाले, काळजी करू नकोस. मी कसा आहे हे त्यांना चांगल्याप्रकारे ठाऊक आहे. त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया पाहून मी चिंतामुक्त झालो. पण बातम्यांमधून, सोशल मीडियावरून टीका काही कमी होत नव्हती. करणच्या घरी ज्या रुममध्ये आम्ही बसलो होतो तिथे तर करणची आईसुद्धा होती. करण व्हिडीओ शूट करत होता हे प्रत्येकालाच माहीत होतं. तसं जर काही असतं तर ड्रग्ज लपवले गेले असते, ते व्हिडीओत शूट का करायला दिले असते?”
करणच्या त्या पार्टीला विकीसोबतच दीपिका पदुकोण, मलायका अरोरा, शाहिद कपूर व त्याची पत्नी मीरा, अर्जुन कपूर, रणबीर कपूर, वरूण धवन व त्याची गर्लफ्रेंड नताशा, झोया अख्तर आणि दिग्दर्शक अयान मुखर्जीसुद्धा उपस्थित होते.