रुपेरी पडद्यावर एखादी भूमिका तंतोतंत साकारण्यासाठी आमिर खान नेहमीच जीवाचे रान करताना दिसतो. त्याच्या आगामी दंगल चित्रपटाकरिताही त्याने आपल्या शरीरयष्टीवर बरीच मेहनत घेतली. गेल्या सात-आठ महिन्यात आमिरच्या शरीरयष्टीत झालेले बदल पाहून सर्वांच्याच भुवया उंचावल्या.

चित्रपटात योग्य असा लूक मिळावा म्हणून मी माझ्या शरीरयष्टीवर काम करतो. पण, दंगलसाठी केलेला बदल हा मला स्वतःसाठीही आश्चर्यकारक होता. या चित्रपटात मी तरुण आणि वयस्कर अशा दोन रुपात दिसणार आहे. चित्रपटात वयस्कर भूमिका साकारण्यासाठी मी वजन वाढवले. माझे वजन तब्बल ९६ किलो झाले ज्यात ३८ टक्के चरबी होते. त्यानंतर पाच महिन्यात मला नऊ टक्के चरबी घटवायची होती, असे आमिर आपल्या वजनाविषयी बोलताना सांगतो.

आमिरने पाच महिन्यात त्याचे वजन कमी केले. त्याच्या या प्रवासाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पहिल्यांदा सुरुवातीलाच इतका त्रास होतो की असं वाटू लागतं पुढे कसं होणार. सुरुवातीलाच ही अवस्था मग पुढे काय? त्यामुळे मी निराश व्हायचो. मग माझ्या मनात जे काही निराशाजनक विचार यायचे त्यांना मी हटवून टाकायचो. जे काही होईल, फक्त आजच्या दिवसाचा विचार कर. जो प्रवास आहे त्याच्या शेवटाचा विचार करू नको. तुमच्या शरीरात बदल करण्यासाठी डायट फार महत्त्वाचे असते. जर तुम्ही योग्य डायट नाही केले तर तुम्ही कितीही व्यायाम करा त्याचा काहीच परिणाम  होत नाही, असे आमिर या व्हिडिओत सांगतो. त्याने तब्बल पाच महिने आपल्या शरीरयष्टीवर कशी मेहनत घेतली याचा ‘फॅट टू फिट’ प्रवास या व्हिडिओत पाहावयास मिळते. पाच महिने उलटल्यानंतर जो आमिर आपल्याला या व्हिडिओत दिसतो तो नक्कीच सर्वांना आश्चर्याचा धक्का देणारा आहे.

आमिरसाठी वजन कमी करणे जितकं कठीण होतं तितकचं वजन वाढवणंही कठीण काम होतं. वजन वाढविण्यासाठी मी सर्व प्रकारचे पदार्थ खात होतो. अगदी जे मी खायला नको तेही.. समोसा, वडा पाव, चॉकलेट्स, केक, ब्राउनी.. मनाला जे वाटेल ते खायचो. जेव्हा मी वजन कमी करायला सुरुवात केली तेव्हा अगदी वेगळाच आहार घेण्यास मी सुरुवात केली. मी फक्त २५ ग्रॅम उपमा आणि पपई आणि जीमनंतर प्रोटीश शेकचे सेवन करायचो, असे आमिर म्हणतो.

कुस्तीपटू गीता फोगट हिने २०१० साली झालेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताला कुस्तीत पहिलेवहिले सुवर्ण पदक मिळवून दिले होते. तिच्याच वडिलांची म्हणजेच कुस्तीपटू महावीर फोगट यांची भूमिका आमिर दंगल या चित्रपटात साकारत आहे. नितेश तिवारी दिग्दर्शित दंगल २३ डिसेंबरला प्रदर्शित होईल.