चीनच्या सान्या येथे पार पडलेल्या मिस वर्ल्ड सौंदर्यस्पर्धेत भारताच्या मानुषी छिल्लरने बाजी मारली. त्यानंतर सोशल मीडियापासून ते अगदी कलाविश्वापर्यंत मानुषीच्याच नावाच्या चर्चा पाहायला मिळत आहेत. भारतासाठी तब्बल १७ वर्षांनी मिस वर्ल्ड किताब पटकावणारी ही सौंदर्यवती काल भारतात आली. मुंबई विमानतळावर तिचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी चाहत्यांचा उत्साह पाहण्याजोगा होता. पण, इतक्या साऱ्या चाहत्यांची गर्दी पाहता तिथे परिस्थिती हाताळण्यापलीकडे गेल्याचे पाहायला मिळाले.

वाचा : आणखी एक प्रसिद्ध मराठी अभिनेता अडकणार लग्नाच्या बेडीत

मानुषी रविवारी मध्यरात्री एकच्या सुमारास भारतात परतली. त्यावेळी तिचे स्वागत करण्यासाठी चाहत्यांनी तिच्या पोस्टरसह बरीच गर्दी केली होती. पण, यावेळी सुरक्षा यंत्रणांमध्ये असलेली कमतरता प्रकर्षाने दिसून आली. विमानतळावर झालेली गर्दी पाहता सुरक्षा यंत्रणांना त्या गर्दीवर नियंत्रण ठेवणे कठीण झाले आणि चाहते, माध्यमांचे प्रतिनिधी आणि सीआयएसएफचे जवान यांच्यात बाचाबाचीही झाली. मानुषी विमानतळावर उतरल्यानंतरचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये गर्दीतून मार्ग काढत मानुषी तिच्या गाडीजवळ जाताना दिसते. अखेर या गर्दीला तोंड देताना तिला डोक्यावर असलेला मिस वर्ल्डचा मुकुट उतरवावा लागला.

PadMan new poster वाचा : सुपर हिरो है ये पगला..

येत्या काही दिवसांमध्ये मानुषी बऱ्याच कार्यक्रमांना हजेरी लावणार असून हैदराबाद येथे २८ नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या ग्लोबल आंत्रपिनरशिप समिट (Global Entrepreneurship Summit (GES)) मध्येही ती सहभागी होणार असल्याचे कळते. भारत आणि अमेरिका या दोन राष्ट्रांच्या संयुक्त विद्यमाने या समिटचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये मानुषी (The Female Influencer: Advancing Women’s Opportunities in the Media Industry ) ‘द फिमेल इनफ्लुएन्सर: अॅडव्हान्सिंग वुमन्स ऑपर्च्युनिटीज इन द मीडिया इंडस्ट्री’ नामक सेशनमध्ये अभिनेत्री सोनम कपूरसोबत सहभागी होणार आहे.