क्रिकेटपटू युवराज सिंग आणि त्याची प्रेयसी अभिनेत्री, मॉडेल हेजल किच काही दिवसांपूर्वीच चंदिगढ येथे विवाहबद्ध झाले. गेल्या बऱ्याच दिवसांपासून चर्चेत असलेले हे जोडपे त्यानंतर गोव्याला पोहोचले. येथे या दोघांचेही काल हिंदू धार्मिक परंपरांअंतर्गत पुन्हा लग्न झाले होते. युवी आणि हेजलच्या गोव्यातील लग्नामध्ये क्रिकेट आणि बॉलिवूड विश्वातील अनेक प्रसिद्ध चेहऱ्यांनीही हजेरी लावली होती.

युवराज आणि हेजल हे अभिनेत्री-क्रिकेटर जोडपे त्यांच्या लग्नामुळे चर्चेत तर आहेच. पण त्याचसोबत आणखी अभिनेत्री-क्रिकेटर जोडी यादरम्यान चर्चेत आली आहे. अर्थातच, ती म्हणजे अनुष्का शर्मा आणि विराट कोहली. युवी-हेजलच्या गोव्यात झालेल्या लग्नाला विराटने अनुष्कासह उपस्थिती लावली होती. हे प्रेमीयुगुल गोव्याला एकाच विमानाने पोहचले होते. तेव्हाही सर्वांच्या नजरा त्यांच्यावर खिळल्या होत्या. युवी-हेजलच्या चंदीगढ येथील लग्नाला विराट-अनुष्का जाऊ शकले नव्हते. त्यामुळे त्यांनी शुक्रवारी दुपारी गोव्यात उपस्थिती लावली. लग्नसमारंभाचा पुरेपूर आनंद घेत विराट आणि अनुष्काने ‘गुरनाल इश्क…’ या पंजाबी गाण्यावर ताल धरत अस्सल पंजाबी पद्धतीने धम्माल नृत्य सादर केल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. पिंकव्हिला या संकेतस्थळाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये विराट आणि अनुष्का एकत्र नाचताना दिसत आहेत.

याआधीही युवीच्या लग्नाच्या पार्टीमध्ये अनुष्काने ‘झिंदगी ना मिलेगी दोबारा’ चित्रपटातील ‘सेनोरिटा’ या गाण्यावर ठेका धरला. तर, विराटने त्याच्या गंगम स्टाइलमध्ये नृत्य केल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत होते.

युवराजच्या लग्नानंतर वैवाहिक आयुष्यासाठी भारतीय संघातील सर्वच खेळाडूंनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. त्या दरम्यान, भारतीय संघात युवराजचा सहकारी राहिलेला सलामीवीर फलंदाज गौतम गंभीर याने युवीला एक सल्ला देऊ केला आहे. पण हा सल्ला क्रिकेटशी संबंधित नसून वैवाहिक जीवनाशी निगडीत आहे. एक विवाहित पुरूष म्हणून गंभीरने नुकतेच विवाहबद्ध झालेल्या युवीला वैवाहिक जीवनात उपयोगी पडेल असा सल्ला क्रिकेटींग अंदाजात दिला. गौतम गंभीरला युवराजच्या संगीत कार्यक्रमात उपस्थित राहता आले नसले, तरी त्याने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून युवीला शुभेच्छा दिल्या. गंभीरने आपल्या ट्विटर हॅण्डलवर युवराज आणि हेजलचा संगीत कार्यक्रमातील फोटो ट्विट केला आहे. गौतम ट्विटरवर म्हणाला की, ‘युवीने आपल्या शेरवानीच्या आत ‘चेस्टगार्ड’ लावलंय असं वाटतंय, पण मित्रा वैवाहिक जीवनात पडणाऱ्या बाऊन्सरपासून बचावासाठी अद्याप कोणताही चेस्टगार्ड तयार करण्यात आलेला नाही.’