बॉलीवूडची चित्रपटांची गणितं भल्याभल्यांना समजत नाहीत. त्यातही इथले निर्माता-दिग्दर्शक आणि कलाकारांचे कंपू हाही एक स्वतंत्र विषय आहे. मात्र या सगळ्या बजबजपुरीत के वळ आपल्या अभिनयाच्या जोरावर चित्रपटच आपल्या नावाने लोकप्रिय करण्याची किमया विद्या बालनसारख्या एखाद्याच अभिनेत्रीकडे आहे. त्यामुळे अनेक अभिनेत्रींची नावं चर्चेला येऊनही ‘कहानी’ हा केवळ विद्या बालनचा ब्रँड आहे हे दिग्दर्शक सुजॉय घोषलाही कबूल करावं लागलं.

[jwplayer zOGMZ9UX]

‘कहानी’मुळे खरं म्हणजे दिग्दर्शक सुजॉय घोष हे नाव लोकप्रिय झालं. त्यामुळे या चित्रपटाच्या सीक्वेलची मागणी होत असताना प्रेक्षकांनाही केवळ विद्या बालनच अभिप्रेत होती. मात्र बॉलीवूड अभिनेत्रींना त्यांच्या कारकीर्दीत अनेक शारीरिक-मानसिक आव्हानांना सामोरं जावं लागतं. तेच थोडय़ा फार प्रमाणात विद्यानेही अनुभवलं. ‘हिरॉईन’ चित्रपटासाठी ऐश्वर्या राय-बच्चनने अगदी आपलं आंतरराष्ट्रीय वजन वापरून ‘कान’ महोत्सवात त्याची घोषणा केली; पण त्यादरम्यान ती गर्भवती आहे हे कळल्यानंतर दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी थेट नाराजी व्यक्त केली. शेवटी तो चित्रपट करीना कपूरकडे गेला. ‘कहानी २’ची उलाढाल सुरू असताना विद्या बालन गर्भवती असल्याच्या चर्चानी जोर धरला. त्या वेळी ‘दुर्गा रानी सिंग’ नावाने येणाऱ्या या चित्रपटासाठी कंगना राणावतचा विचार सुरू झाला होता. अगदी त्या वेळी दिग्दर्शक सुजॉय घोषने यात विद्या नाही अशीच ग्वाही दिली होती. कंगना राणावत, करीना क पूर अगदी दीपिकाचेही नाव घेऊन झाले आहे. अखेर हा चित्रपट विद्या बालनच्याच मुख्य भूमिकेत प्रदर्शित होणार आहे. या वेळी मात्र विद्याबरोबर काम करायचं नव्हतं म्हणूनच ‘कहानी २’साठी कंगनाचा विचार झाला होता, या प्रश्नाला सुजॉय घोष यांनी थेट उत्तर टाळलं. विद्याबरोबर आपला वाद होऊच शकत नाही, असं सांगत ‘कहानी’ हा फक्त विद्याचा ‘ब्रँड’ आहे अशी पावतीही दिग्दर्शकाने जोडली.

विद्या बालन मात्र आपल्या नावामागे जोडलेल्या या ‘कहानी’ ब्रँडमुळे खूप खूश आहे. तुम्ही तुमच्या प्रत्येक भूमिकेसाठी जीव ओतून काम करत असता आणि त्याच कामाची पावती म्हणून जेव्हा तो चित्रपट तुमची ओळख बनतो तेव्हाचा आनंद शब्दांत मांडता येणारा नाही, असं विद्याने ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितलं.

काही चित्रपट असे असतात जे प्रेक्षकांच्या मनात कायमची जागा घेतात. ‘कहानी’ हा त्यातला चित्रपट आहे, तो पुन्हा बनवला जाऊ शकत नाही. त्यामुळे ‘कहानी २’ करताना यात विद्या बागची (जी ‘कहानी’ची नायिका आहे) कुठेही लोकांसमोर येणार नाही, तिची आठवण होणार नाही. या पद्धतीने कथा रचणं आणि देहबोलीपासून संवादफेकीतील बदलापर्यंत अनेक गोष्टी सातत्याने दिग्दर्शकाशी चर्चा करून आपण ही नवी व्यक्तिरेखा साकारली असल्याचे तिने सांगितले. मात्र ‘कहानी’चे यश हे जसे दिग्दर्शकाचे होते तसेच ‘कहानी २’ हा चित्रपटसुद्धा सुजॉय घोषच्या दिग्दर्शनाशिवाय शक्य नाही, असं तिने स्पष्ट केलं. दिग्दर्शक आणि कलाकार यांच्यात परस्परसामंजस्य असेल तर त्याचा परिणाम अर्थात सेल्युलॉइडवर उमटतोच. ‘कहानी’पेक्षाही सीक्वेलमध्ये तो जास्त चांगल्या पद्धतीने दिसेल, असे सुजॉयला वाटते. मुळात, ‘दुर्गा रानी सिंग’ हा शब्दश: ‘कहानी’चा सीक्वेल नसल्याचे त्यांनी सांगितले. यात विद्या बालनने दुर्गा रानी सिंग ही व्यक्तिरेखा साकारली आहे. एका आईचा आपल्या मुलीला शोधण्यासाठी, तिला वाचवण्यासाठी केलेला संघर्ष हा ‘कहानी २’चा कथाभाग आहे. आपल्या मुलीला वाचवण्यासाठी एक आई अख्ख्या जगाशी संघर्ष करू शकते, हा त्याचा मुख्य भाग असल्याने विद्या बालनशिवाय या भूमिकेला कोणीही न्याय देऊ शकलं नसतं, असं सुजॉयने सांगितलं. स्वत: विद्याला ही व्यक्तिरेखा पहिल्या चित्रपटापेक्षा आव्हानात्मक वाटते. अर्थात, पहिल्या चित्रपटातील प्रत्येक  व्यक्तिरेखा, विद्या बागचीचे हावभाव, तिचे संवाद अशा गोष्टी लोकांना तोंडपाठ आहेत. त्यामुळे पुन्हा कोलकात्यातच ‘दुर्गा रानी सिंग’ची कथा रंगवताना विद्या बागचीचं दडपण जास्त होतं, हेही विद्याने क बूल केलं. यात विद्याने पहिल्यांदाच अर्जुन रामपालबरोबर काम केलं आहे. सध्या तिचं लक्ष पूर्णपणे ‘कहानी २’च्या प्रसिद्धीवर आहे आणि तिच्या नेहमीच्या खाक्याप्रमाणे ती संपूर्ण व्यक्तिरेखेत शिरून चित्रपटाची प्रसिद्धी करते त्याचप्रमाणे आत्ताही ठिकठिकाणी तुरुंगात शिरून ती मुलाखती देते आहे. लोकांनी याला वेडेपणा म्हटलं तरी चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी कलाकारांनी या गोष्टी केल्याच पाहिजेत हे विद्याचं ठाम मत आहे. म्हणूनच सध्या बॉलीवूड अभिनेत्रींमध्ये विद्या बालन हा वेगळा ‘ब्रँड’ ठरला आहे.

[jwplayer 2wTdAIn1]