अ‍ॅक्शन हिरो विद्युत जामवाल लवकरच एका नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या आगामी चित्रपटाचं नाव ‘खुदा हाफिज’ असं आहे. डिस्ने हॉटस्टार प्लस या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. मात्र अलिकडेच हॉटस्टारने आयोजित केलेल्या ऑनलाईन पत्रकार परिषदेत विद्युतला आमंत्रण मिळालं नव्हतं. परिणामी त्याने सोशल मीडियाद्वारे आपली नाराजी व्यक्त केली होती. हेच निमित्त साधून एका अज्ञात व्यक्तीने विद्युतचं फेक ट्विटर अकाउंट तयार केलं आहे. या अकाउंटवरुन तो विद्युतच्या नावाचे ट्विट करत आहे. हे ट्विट पाहून विद्युत देखील चक्रावला. त्याने या ट्विटवर प्रतिक्रिया देत आश्चर्य व्यक्त केलं आहे.

अवश्य पाहा – ‘गरीबांवर असा अत्याचार भारतातच होऊ शकतो’; तो व्हिडीओ पाहून अभिनेत्याची पोलिसांवर टीका

अवश्य पाहा – “हे सारं कल्पनेच्या पलिकडलं”; मुंबईत नसतानाही अभिनेत्रीला आलं ३२ हजार वीज बिल

“तुम्ही लोकं खऱ्या टॅलेंटला प्रोत्साहन देणार होता ना? माहिती आहे का? माझ्या आगामी चित्रपटाचा ट्रेलर आला आहे.” अशा आशयाचं ट्विट विद्युतच्या फेक अकाउंटवरुन करण्यात आलं होतं. हे ट्विट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालं. व्हायरल होणाऱ्या या ट्विटवर विद्युत जामवालची नजर पडली. हे फेक अकाउंट पाहून तो पार चकित झाला. “खोट्या वस्तूंवर भाष्य करणं हे माझं काम नाही. पण कृपया कोणीतरी मला सांगा, इतकं खरं दिसणारं हे अकाउंट तयार तरी तसं केलं?” अशा आशयाचं ट्विट करुन त्याने आश्चर्य व्यक्त केलं. विद्युत जामवालचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.