काही दिवसांपूर्वीच निर्माता-दिग्दर्शक करण जोहरने ‘डीअर कॉम्रेड’ या तेलुगू चित्रपटाचे हिंदी रिमेकसाठी हक्क मिळवल्याचे जाहीर केले. ‘अर्जुन रेड्डी’ फेम अभिनेता विजय देवरकोंडा व रश्मिका मंदाना यांची तेलुगू चित्रपटात मुख्य भूमिका आहे. ‘अर्जुन रेड्डी’चा हिंदी रिमेक ‘कबीर सिंग’ प्रेक्षकांच्या भेटीला आल्यापासून विजयची फॅन फॉलोईंग दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे त्यालाच ‘डिअर कॉम्रेड’च्या हिंदी रिमेकमध्ये घेण्याचा विचार करणने केला. यासाठी विजयला तो ४० कोटी रुपये मानधन देण्यासही तयार होता. पण विजयने करणची ही ऑफर नाकारल्याची माहिती समोर येत आहे.
एकच भूमिका दोन वेगवेगळ्या भाषांमध्ये साकारण्यास विजयचा नकार आहे. एका मुलाखतीत विजय याविषयी म्हणाला, ‘मला हिंदी चित्रपटांमधील हिरो व्हायची इच्छा नाही. मला उत्तम अभिनेता व्हायचं आहे. एकच गोष्ट दोनदा सांगण्यात काही अर्थ नाही असं माझं मत आहे. मी माझ्या भूमिकांसाठी खूप मेहनत घेतो आणि तीच गोष्ट पुन्हा रिमेकसाठी करण्याची माझी इच्छा नाही. प्रत्येक सीन मला आधीच माहीत असल्याने त्यातील उत्साह निघून जातो. त्यामुळे तेच ते करण्यात माझे सहा महिने मी वाया नाही घालवू शकत.’
https://www.instagram.com/p/B0Qq1qFJAoY/
आणखी वाचा : ”वीणाला बहीण मानून राखी बांधून घे”; शिव ठाकरे पाळेल का आईची आज्ञा?
करण जोहरने ‘डिअर कॉम्रेड’चे हक्क सहा कोटी रुपयांसाठी विकत घेतले आणि विजयला तो ४० कोटी रुपये मानधन देण्यासही तयार होता. पण आता विजयने स्पष्ट नकार दिल्याने ‘डिअर कॉम्रेड’च्या हिंदी रिमेकसाठी कोण भूमिका साकारणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.