भारताच्या सर्वांत मोठ्या सेलिब्रिटी ब्रँडचा मान भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने पटकावला आहे. यामध्ये त्याने बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुखलाही मागे टाकले आहे. विराटची ब्रँड व्हॅल्यू ९२२ कोटी रुपये तर शाहरुखची ६७९ कोटी रुपये इतकी आहे. विशेष म्हणजे शाहरुखच्या ब्रँड व्हॅल्यूत २० टक्क्यांनी घसरण झाली आहे. ‘डफ अँड फेल्प्स’ या आर्थिक सल्लागार संस्थेने यासंदर्भातील अहवाल सादर केला आहे. विविध उत्पादनांच्या प्रसिद्धीसाठी दिल्या जाणाऱ्या मानधनातील वाढ, क्रिकेटच्या मैदानावरील कामगिरी आणि एकंदरीत प्रसिद्धीमध्ये झालेली वाढ या गोष्टींचा विचार करून विराटची ब्रँड व्हॅल्यू ठरवण्यात आली आहे.

‘राइज ऑफ द मिलेनियल्स: इंडियाज मोस्ट व्हॅल्यूएबल सेलिब्रिटी ब्रँड’ या शीर्षकाअंतर्गत हा अहवाल सादर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे पहिल्यांदा शाहरुख या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. एखाद्या ब्रँडसाठी किंवा ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आता पहिली पसंती विराटला दिली जात आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. यामागचे कारण म्हणजे मैदानावरील त्याची कामगिरी आणि त्याच्या प्रसिद्धीत झालेली वाढ.

वाचा : वाढदिवसाची भेट म्हणून छोट्या नवाबला दिलं ‘जंगल’

या यादीत ९.३ कोटी डॉलर ब्रँड व्हॅल्यूसह अभिनेत्री दीपिका पदुकोण तिसऱ्या स्थानावर आहे. तर टॉप १५ मध्ये आलिया भट्ट, वरुण धवन या सेलिब्रिटींसह बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूचाही समावेश आहे.