बॉलिवूडची देसी गर्ल म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे प्रियांका चोप्रा. या देसी गर्लने हॉलिवूड गायक निक जोनासशी लग्न केल्यामुळे आज ती परदेशी सून झाली आहे. मात्र कलाकार, गायिका, यशस्वी उद्योजक म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर तिला नावलौकिक मिळाले आहे. सध्या प्रियांका तिचा आगमी चित्रपट ‘द स्काय इज पिंक’च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. दरम्यान तिने एका मुलाखतीमध्ये तिचे आवडते भारतीय क्रिकेटपटू कोण आहेत याचा खुलासा केला आहे.

विशाखापट्टणम येथे ३ ऑक्टोबर पासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारत हा पहिला कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यादरम्यान प्रियांकाने स्टार स्पोर्टस वाहिनीशी संवाद साधला. तेथे प्रियांकाला तिचे आवडते भारतीय क्रिकेटपटू कोण असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर प्रियांकाने तिला रोहीत शर्मा आणि भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आवडत असल्याचे सांगितले. आता विराट आणि रोहीतच्या चाहत्यांच्या यादीमध्ये बॉलिवूड स्टार प्रियांकाचे नाव नोंदण्यात आले आहे.

शोनाली बोस दिग्दर्शित ‘द स्काय इज पिंक’ चित्रपटामध्ये प्रियांका चोप्रासह झायरा वसीम, फरहान अख्तर, रोहित सराफ यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटात एका कुटुंबाची भावनिक कथा दाखवण्यात येणार आहे. ज्यामध्ये प्रियांका-फरहानची प्रेमकहाणी आणि त्यानंतर त्यांच्या मुलीला होणारा दुर्मिळ आजार याबद्दल दाखवण्यात आले आहे. हा चित्रपट ११ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. प्रियांका या चित्रपटातून तीन वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये परतत आहे. २०१६ मध्ये तिचा ‘जय गंगाजल’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. चाहते प्रियांकाला रुपेरी पडद्यावर पुन्हा पाहण्यासाठी आतुर झाले आहेत.