टीव्ही स्टार सिद्धार्थ शुक्लाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्याच्या निधनानंतर त्याचे चाहते खूप दु: खी आहेत. त्यांनी सोशल मीडियाद्वारे आपले दु :ख व्यक्त केले आहे. ‘बिग बॉस’चा विजेता असलेला सिद्धार्थ आता या जगात नाही, यावर कोणालाही विश्वास ठेवता येत नाहीये. सिद्धार्थच्या चाहत्यांशिवाय भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागदेखील या घटनेने दु: खी झाला आहे.

सेहवागने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून आपल्या सिद्धार्थच्या निधनावर आपला शोक व्यक्त केला आहे. ‘जीवन किती नाजूक आहे याचे आणखी एक उदाहरण. सिद्धार्थ शुक्लाच्या कुटुंबाला आणि मित्रांना हार्दिक संवेदना. शांतता”, असे सेहवागने आपल्या ट्वीटमध्ये म्हटले. तर हरभजन सिंग ट्वीट करून ”धक्कादायक. देव त्याच्या कुटुंबाला हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो.” असे म्हटले.

 

 

हेही वाचा – ENG vs IND : चौथ्या कसोटीपूर्वी ‘वर्ल्डकपविजेत्या’ खेळाडूचा मोठा निर्णय; ‘या’ कारणामुळे होता निराश

सिद्धार्थचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची माहिती मुंबईतील कुपर रुग्णालयाने दिली आहे. बुधवारी रात्री झोपण्यापूर्वी सिद्धार्थने काही औषधे घेतली होती. त्यानंतर आज सकाळी त्याला कुपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी सिद्धार्थचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे समोर आले.

सिद्धार्थचा प्रवास

१२ डिसेंबर १९८० रोजी सिद्धार्थचा जन्म मुंबईत झाला. त्याने एक मॉडेल म्हणून करिअरला सुरुवात केली होती. २००४ साली त्याने छोट्या पडद्यावर पदार्पण केले. त्यानंतर २००८मध्ये त्याने बाबुल का आंगन छूटे या मालिकेत काम केले. पण ‘बालिका वधू’ या मालिकेने त्याला खरी ओळख मिळवून दिली होती. त्याने रिअॅलिटी शो बिग बॉस १३मध्ये सहभाग घेतला होता आणि त्या सिझनचा तो विजेताही ठरला होता. त्यानंतर त्याने खतरों के खिलाडी या शोच्या सातव्या सिझनमध्येही सहभाग घेतला होता.