हिंदू दहशतवादाबाबत केलेल्या विधानामुळे अभिनेता आणि मक्कल निधी मियाम पक्षाचे अध्यक्ष कमल हासन यांच्यावर सर्व स्तरांमधून टीका होत आहे. त्यातच आता बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी कमल हासन यांच्यावर टीका करायला सुरुवात केली आहे. ‘जसा कलाकाराला धर्म नसतो, तसाच दहशतवादालाही धर्म नसतो’, असं म्हणत अभिनेता विवेक ओबेरॉय यांनी कमल हासन यांना टोला लगावला आहे.
विवेक ओबेरॉयने ट्विटरच्या माध्यमातून कमल हासन यांच्यावर टीका केली आहे. “प्रिय कमल सर, तुम्ही उत्तम कलाकार आहात. ज्याप्रमाणे एखाद्या कलाकाराला धर्म नसतो, तसाच दहशतवादालादेखील धर्म नसतो. तुम्ही गोडसेला दहशतवादी म्हणून शकता. परंतु त्याच्या नावापुढे ‘हिंदू’ शब्द का वापरावा ? तुम्ही त्यावेळी मुस्लिमबहुल भागातमध्ये भाषण देत होतात. त्यामुळे काही मुस्लिम मतं मिळावित यासाठी असं वक्तव्य करणं योग्य आहे ? आपण सारेजण एकच आहोत. त्यामुळे देशाचं विभाजन होईल असं वक्तव्य करु नका,” असं विवेकने म्हटलं आहे.
Dear Kamal sir, you are a great artist. Just like art has no religion, terror has no religion either! You can say Ghodse was a terrorist, why would you specify ‘Hindu’ ? Is it because you were in a Muslim dominated area looking for votes? @ikamalhaasan https://t.co/Hu3zxJjYNb
— Vivek Anand Oberoi (@vivekoberoi) May 13, 2019
दरम्यान, नथुराम गोडसे हा स्वातंत्र्योत्तर भारतातील पहिला हिंदू दहशतवादी होता, असं विधान कमल हासन यांनी चेन्नईतील अरिवाकुरुची विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारसभेत बोलताना केलं. या घटनेनंतर भाजपा आणि शिवसेनेकडून त्यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध केला आहे. इतकंच नाही तर अखिल भारतीय हिंदू महासभेने त्यांना जाहीरपणे जीवे मारण्याची धमकी दिली आहे.