अभिनेता कृष्णा अभिषेक व अभिनेता गोविंदा या मामा-भाचामधील वाद काही नवीन नाही. या कौटुंबिक वादाबद्दल आता गोविंदाने मौन सोडलं आहे. वारंवार कृष्णाकडून केल्या जाणाऱ्या आरोपांना वैतागल्याची भावना गोविंदाने व्यक्त केली. त्याचप्रमाणे कौटुंबिक वाद सार्वजनिक करणं म्हणजे हे असुरक्षिततेचं लक्षण आहे, असा टोला गोविंदाने कृष्णाला लगावला.

काय आहे प्रकरण?

‘द कपिल शर्मा शो’मध्ये गोविंदाला आमंत्रित करण्यात आलं होतं. त्यावेळी कौटुंबिक वादामुळे कृष्णाने शोमध्ये कॉमेडी करण्यास नकार दिला आणि त्या एपिसोडमध्ये तो गैरहजर राहिला. याविषयी नंतर त्याने कारण सांगितलं. “मामा गोविंदासोबत काही वाद असल्याने मी शोमध्ये येण्याचं टाळलं. आमच्या वादामुळे शोवर काही परिणाम होऊ नये म्हणून हा निर्णय घेतला. विनोद करण्यासाठी सेटवरचं वातावरण फार मैत्रीपूर्ण असावं लागतं आणि गोविंदा मामा तिथे असताना माझ्यासाठी ते शक्य नव्हतं”, असं कृष्णाने स्पष्ट केलं. या पार्श्वभूमीवर गोविंदाने आता त्याची बाजू मांडली आहे.

काय म्हणाला गोविंदा?

“माझ्यावर सतत हे आरोप का केले जात आहेत हेच मला कळत नाहीये. त्यांना यातून काय मिळतंय? कृष्णा लहान असल्यापासून माझं त्याच्याशी खूप चांगलं नातं आहे. कुटुंबीय आणि इंडस्ट्रीतील काही व्यक्तीसुद्धा याबद्दल सांगू शकतील. पण खरंच असं वाटतं की कौटुंबिक वाद सार्वजनिक ठिकाणी बोलून दाखवणं हे असुरक्षिततेचं लक्षण आहे. यामुळे बाहेरच्या व्यक्तींना कौटुंबिक गैरसमजुतींचा फायदा घ्यायची संधी मिळते. यापुढे मी त्यांच्यापासून योग्य ते अंतर राखूनच राहीन. प्रत्येक कुटुंबात काही समस्या किंवा वाद असतात. पण त्यांना असं सार्वजनिक ठिकाणी मांडल्याने कधीच भरून न निघणारा तोटा होऊ शकतो. मी तर सर्वांत गैरसमज करून घेतलेला व्यक्ती आहे, आणि असंच असेल तर राहू द्या. माझ्या आईने मला नेहमीच सांगितलंय की, चांगलं कर्म कर आणि फळाची अपेक्षा करू नकोस.”