बॉलिवूड सेलिब्रिटीचा गणेशोत्सव म्हटलं की चर्चा होते ती म्हणजे सेलिब्रेशनची, मोठमोठाल्या समारंभांची. सध्याही एकिकडे ढोल- ताशांचा गजर, फुलांची आरास आणि प्रचंड उत्साही वातावरणात बरेच बी- टाऊन सेलिब्रिटी हा उत्सव साजरा करण्यात मग्न आहेत. तर या सर्व उत्साही वातावरणापासून दूर रहात अभिनेता रितेश देशमुख मात्र अनोख्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करतोय. यंदाच्या वर्षी रितेशने अमेरिकेत गणेशोत्सव साजरा केला असून, त्याने यासंबंधीचा एक व्हिडिओही ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे.

इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करा, असा नुसता संदेश न देता रितेशने अनोख्या पद्धतीने स्वत: या पद्धतीचा अवलंब करत गणेशोत्सव साजरा केला. त्याने स्वत: गणपती बाप्पाची मूर्ती बनवली आहे. मोठ्या कलात्मकपणे त्याने हा बाप्पा साकारला असून, त्यामध्ये एक कुंडीही बनवली आहे. ज्यामध्ये त्याने तुळशीचं बीसुद्धा पेरलं आहे. ‘मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, म्हणूनच ही मूर्ती मी सर्व शेतकऱ्यांना समर्पित करतो’, असंही त्याने ट्विटमध्ये स्पष्ट केलं आहे.

वाचा : माहेरचा गणपती : चैतन्य, भरभराट आणि उत्साहाची उधळण करणारा माझा नवसाचा बाप्पा- अक्षया गुरव

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडिओ पाहता सर्वांना पोटभर अन्न मिळावं यासाठी शेतामध्ये काबाडकष्ट करणाऱ्या बळीराजाप्रती रितेशने कृतज्ञता दाखवली आहे असं म्हणायला हरकत नाही. त्याने या व्हिडिओचं चित्रीकरण केल्याबद्दल पत्नी जेनेलिया हिचेही आभार मानले आहेत. त्याने पोस्ट केलेल्या या व्हिडिओमध्ये ‘थँक गॉड बाप्पा आपल्यासारखा नसतो’ हे गाणंही वाजतंय. त्यामुळे रितेशचा हा इको फ्रेंडली बाप्पा तितक्याच प्रभावीपणे सर्वांपर्यंत पोहोचत आहे. सामाजिक भान जपत काही महत्त्वाचे मुद्दे जातीनं सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि समाजपयोगी कामांना हातभार लावण्यासाठी रितेश नेहमीच पुढे असतो. बळीराजाप्रती प्रचंड आदर असलेला हा मराठमोळा अभिनेता आपण एका शेतकऱ्याच्याच कुटुंबात जन्माला आलो आहोत ही बाबही विसरत नाही.