दिग्दर्शक मधुर भंडारकरने आपल्या आगामी ‘इंदू सरकार’ या चित्रपटातील पहिलं गाणं प्रदर्शित केलंय. फेमस कव्वाली ‘चढता सूरज धीरे धीरे…’चं नवीन व्हर्जन यामध्ये पाहायला मिळणार आहे. ट्विटर अकाऊंटवरून हे गाणं प्रदर्शित करण्याआधी मधुर भंडारकर आणि चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री किर्ती कुल्हारीने याबाबत सविस्तर माहिती प्रेक्षकांना दिली. चित्रपटात ही कव्वाली का गरजेची होती हे त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला.

‘७० व्या दशकातील या प्रसिद्ध आणि लोकप्रिय कव्वालीला चित्रपटात नवं रूप देण्याचा प्रयत्न केला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांकडून मिळालेल्या उत्स्फुर्त प्रतिसादामुळे आम्हाला खूप आनंद झाला. प्रेक्षकांच्या अपेक्षांवर हा चित्रपट खरा उतरेल अशी आमची अपेक्षा आहे,’ अशी माहिती किर्ती आणि मधुर भंडारकर यांनी ट्विटरवरून दिली.

https://twitter.com/InduSarkarMovie/status/880010419615617024

आजकाल नवीन चित्रपटांमध्ये अनेक जुन्या गाण्यांचं नवं व्हर्जन आणलं जातं मात्र कव्वाली नव्या रूपात आणली गेली नाही असं म्हणत मधुर भंडारकर यांनी कव्वालीबद्दल अधिक माहिती दिली. याबद्दल ते म्हणाले, ‘मी आणि अनु मलिक एकत्र बसलो आणि कोणती कव्वाली घेता येईल याचा विचार करतो. अखेर ७० व्या दशकातील या लोकप्रिय कव्वालीचं नवीन व्हर्जन आणण्याचं ठरवलं.’ ‘इंदू सरकार’ या चित्रपटाविषयी सांगताना ते पुढे म्हणाले की, ‘हा चित्रपट महिलाप्रधान असून अंशत: काल्पनिक आणि अंशत: खऱ्या घटनांवर आधारित आहे.’

वाचा : अबब…चित्रपटासाठी इतका म्हातारा झाला सलमान खान!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चित्रपटाच्या ट्रेलरप्रमाणेच या कव्वालीलासुद्धा प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळतो का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. २८ जुलैला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात किर्ती कुल्हारी आणि नील नितीन मुकेशसोबतच ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेरसुद्धा भूमिका साकारताना दिसणार आहेत. त्याशिवाय इंदिरा गांधींच्या भूमिकेत अभिनेत्री सुप्रिया विनोद प्रेक्षकांना एका वेगळ्या काळाची सफर घडवणार यात शंकाच नाही.