कलाकारांची लोकप्रियता आणि त्यांच्या कामगिरीची दखल घेत मादाम तुसाँ संग्रहालयात आजवर अनेक कलाकारांचे मेणाचे पुतळे साकारण्यात आले. यामध्ये आता आणखी एका प्रसिद्ध चेहऱ्याची भर पडणार असून मधुबाला यांचा मेणाचा पुतळा साकारण्यात येणार आहे. सुप्रसिद्ध चित्रपट ‘मुघल ए आझम’मधील मधुबालाच्या अनारकलीच्या भूमिकेची प्रेरणा घेत हा पुतळा साकारण्यात येणार आहे. दिल्लीतल्या मादाम तुसाँ संग्रहायलात मधुबाला यांचा हा मेणाचा पुतळा साकारण्यात येणार. लंडनमध्ये मुख्य संग्रहालय असलेल्या मादाम तुसाँची दिल्लीत २२वी शाखा आहे.

१४ फेब्रुवारी १९३३ रोजी दिल्लीतील एका पश्तून मुस्लिम कुटुंबात मधुबालाचा जन्म झाला. मधुबालाला दहा बहिणभावंडं होती. भारतीय चित्रपटसृष्टीत सुप्रसिद्ध आणि यशस्वी अभिनेत्री म्हणून तिने नाव कमावलं. चेहऱ्यावरील हावभाव आणि अदाकारीसाठी मधुबाला विशेष प्रसिद्ध होती.

वाचा : नव्वदच्या दशकात बॉलिवूड गाजवणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीला ओळखलंत का?

अभिनय कौशल्य, व्यक्तिमत्त्व आणि सौंदर्याला पाहून भारतीय चित्रपटसृष्टीतील आतापर्यंतची सर्वांत महान अभिनेत्री म्हणून मधुबाला यांना संबोधित केलं जातं. मधुबाला यांचं नाव लहानपणी मुमताज असं होतं. मुमताज या नावाने प्रसिद्धी आणि संपत्ती या दोन्ही गोष्टी मिळतील असं एका ज्योतिषाने त्यांच्या आईवडिलांना सांगितलं होतं. त्यानंतर दिल्लीहून मुंबईला त्यांचं संपूर्ण कुटुंब स्थलांतरित झालं.

वाचा : अमेरिकन डीजे डिप्लोच्या म्युझिक व्हिडिओमध्ये किंग खान

१९४२ साली ‘बसंत’ या चित्रपटातून त्यांनी कारकिर्दीला सुरुवात केली. त्यावेळी बेबी मुमताज नावाने त्या ओळखल्या जायच्या. या चित्रपटातील त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन अभिनेत्री देविका रानी यांनी मुमताज हे नाव बदलून मधुबाला नाव ठेवण्यास सांगितले. राज कपूर यांच्यासोबतच्या ‘नीलकमल’ चित्रपटात त्यांचं मुमताज म्हणून शेवटचं नाव गेलं. त्यानंतर त्यांना मधुबाला याच नावाने सर्वजण ओळखू लागले.