वेब सीरिजच्या वाढत्या विश्वात आता आणखी एका महत्त्वपूर्ण विषयाची भर पडणार आहे. माजी मुंबई पोलीस आयुक्त राकेश मारिया यांच्या जीवनावर आधारित वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘राजी’ चित्रपटाच्या दिग्दर्शिका आणि गीतकार गुलजार यांची कन्या मेघना गुलजार या वेब सीरिजचं दिग्दर्शन करणार आहे.

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने या वेब सीरिजची माहिती ट्विटरवर दिली आहे. रिलायन्स एंटरटेन्मेंट, फॅँटम आणि मेघना गुलजार या सीरिजसाठी एकत्र येत आहेत. राकेश मारिया यांनी हाताळलेली महत्त्वपूर्ण प्रकरणं आणि त्यांची कारकीर्द यावर वेब सीरिजच्या माध्यमातून प्रकाशझोत टाकण्यात येणार आहे.

वाचा : ‘संजू’ने मोडला ‘बाहुबली २’चा विक्रम

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त व गृहरक्षक दलाचे महासंचालक राकेश मारिया हे तब्बल ३६ वर्षांच्या सेवेनंतर गेल्या वर्षी पोलीस दलातून निवृत्त झाले. मारिया १९८१च्या आयपीएस बॅचचे अधिकारी होते. १९९३च्या बॉम्बस्फोटापासून ते २६/११चा दहशतवादी हल्ला आणि बहुचर्चित शीना बोरा हत्याकांड यांसारख्या महत्त्वाच्या गुन्ह्यांच्या तपासामध्ये मारिया यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.