आमिर खान आणि किरण रावच्या घटस्फोटाने बॉलिवूड तसचं चाहत्यांमध्ये खळबळ माजली आहे. १५ वर्षांच्या संसारानंतर आमिर खान आणि त्याची दुसरी पत्नी किरण राव एकमेकांच्या सहमतीने विभक्त झाले आहेत. दरम्यान आमिर खान आणि त्याची पहिली पत्नी रीना दत्ता यांचा संसार देखील १६ वर्ष चालला होता. पहिल्या लग्नाला १६ वर्ष पूर्ण झाल्यानंतर आमिर आणि रीना दत्ता विभक्त झाले होते. मात्र पहिल्या घटस्फोटावेळी आमिरची स्थिती काहीशी वेगळी होती.
आमिर खान आणि रीना दत्ताने १९८६ सालात लग्नगाठ बांधली होती. आमिर खान रीनाच्या प्रेमात वेडा होता. मात्र तरीही १६ वर्षांनी दोघांनी घटस्फोट घेतला. या घटस्फोटानंतर आमिर खानला या धक्क्यातून सावरण्यासाठी सलमान खानने मदत केली होती. आमिर खाननेच ‘कॉफी विथ करण’ या करण जोहरच्या शोमध्ये या गोष्टीचा खुलासा केला होता.
आणखी वाचा: “आता फातिमासोबत शुभमंगल”, आमिर खानच्या घटस्फोटानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
या शोमध्ये आमिर म्हणाला, “जेव्हा मी आयुष्याच्या सर्वात दु:खी आणि वाईट काळातून जात होतो तेव्हा सलमान खानची माझ्या आयुष्यात एण्ट्री झाली. तेव्हा माझ्या पत्नीशी माझा घटस्फोट झाला होता. मी आणि सलमान एकदा समोरासमोर आलो तेव्हा त्याने भेटायची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर आम्ही भेटलो आणि बराच वेळ गप्पा मारल्या. तेव्हा पासून आमच्या मैत्रीला सुरुवात झाली. त्याने मला आधार दिला.”
असं असलं तरी एककाळ असा होता की आमिर खानला सलमान खानचा स्वभाव अजिबात आवडतं नसल्याने आमिरला सलमानपासून दूर राहणंच पसंत होतं. ‘अंदाज अपना अपना’ सिनेमात सलमानसोबत काम करण्याचा अनुभव वाईट असल्याचं देखील आमिर करण जोहरच्या शोमध्ये म्हणाला होता.
आमिर खान आणि किरण राव काय म्हणाले स्टेटमेंटमध्ये
दरम्यान आमिर खान आणि किरण रावने एक स्टेटमंट प्रसिद्ध करत घटस्फोटाची माहिती दिलीय. या स्टेटमेंटमध्ये ते म्हणाले आहेत,” १५ वर्षांच्या सुंदर संसारात आम्ही हसत-खेळत प्रत्येक क्षण घालवला आहे. यादरम्यान आमचं नातं विश्वास आणि सन्मानाने पुढे जात राहिलं. आता आम्ही आमच्या आयुष्याचा नवा अध्याय सुरु करत आहोत. जिथे आम्ही पती-पत्नी नसून फक्त आमच्या मुलाचे पालक असू आणि कुटुंबाचे एक भाग असू. काही दिवसांपूर्वीच आम्ही विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. आता आम्ही वेगवेगळे राहण्यात समाधानी आहोत. आझादसाठी आम्ही त्याचे पालक असून त्याचा उत्तमपणे सांभाळ करू” असं आमिर आणि किरण या स्टेटमेंटमध्ये म्हणाले आहेत.