बॉलिवूडमध्ये प्रेमविवाह केलेली अशी काही जोडपी आहेत ज्यांची लग्न अनेक वर्ष टिकली. त्याचसोबत अशीही काही उदाहरण बॉलिवूडमध्ये सापडतात ज्यांच्या प्रेमकथा खूप गाजल्या मात्र, त्याचे लग्नात रुपांतर होऊ शकले नाही. काही बॉलिवूड सेलिब्रिटींच्या प्रेमाची गाडी अगदी साखरपुड्यापर्यंत गेली. पण ही गाडी लग्नाच्या स्टेशनपर्यंत येण्यापूर्वीच घसरली. काही ना काही कारणामुळे त्यांचे लग्न मोडले. अशा काही सेलिब्रिटी जोड्यांवर नजर टाकूया.
अक्षय कुमार – रवीना टंडन
९०च्या दशकातील हॉट जोड्यांमध्ये अक्षय आणि रवीना या जोडीचे नाव घेतले जायचे. ‘मोहरा’ चित्रपटादरम्यान या दोघांमधील जवळीक वाढली. तीन वर्षांच्या दीर्घ प्रेमप्रकरणानंतर या दोघांनी एका देवळात साखरपुडा केल्याचे स्वतः रवीनाने मान्य केलेले. पण, हे नाते अजून पुढे जाण्याआधी अक्षयच्या आय़ुष्यात एका नव्या अभिनेत्रीने एण्ट्री घेतली. ती अभिनेत्री म्हणजे शिल्पा शेट्टी. या दोघांच्या अफेअरबद्दल समजताच रवीनाने स्वतः लग्न मोडण्याचा निर्णय घेतला.
अभिषेक बच्चन – करिष्मा कपूर
श्वेता नंदाच्या लग्नात अभिषेक आणि करिष्मामध्ये जवळीक निर्माण झाली. करिष्माच्या चुलत भावाशी श्वेताने लग्न केलेय. इतकेच नव्हे तर ‘रिफ्युजी’च्या सेटवर करिना अभिषेकला जीजू असे म्हणायची. अमिताभ बच्चन यांनी तर अभी – लोलोच्या साखरपुड्याची घोषणाही केलेली. पण करिष्माची आई बबिता यांना अभिषेक पसंत नव्हता. अभिषेकने तेव्हा नुकतच करिअरला सुरुवात केलेली आणि करिष्मा त्यावेळी प्रसिद्धीच्या शिखरावर होती. या कारणामुळे बबिता यांनी करिष्माच्या लग्नाचा प्रस्ताव नाकारला. आपल्या आईपुढे करिष्माचेही काही चालले नाही.
सलमान खान – संगीता बिजलानी
सलमान आणि संगीताच्या लग्नाच्या चर्चा प्रचंड सुरु होत्या. पण, त्यावेळी सलमानच्या आयुष्यात सोमी अली आली आणि संगीता त्याच्यापासून दूर गेली. सलमान – संगीताच्या लग्नाच्या पत्रिकाही तेव्हा छापल्या गेल्या होत्या असे एका मुलाखती दरम्यान स्वतः सलमानने सांगितले होते.
विवेक ओबेरॉय – गुरप्रीत गिल
हे दोघेही एकमेकांना २००० साली डेट करत होते. २००२ साली त्यांचा साखरपुडाही झाला. त्यावेळी ‘रोड’ चित्रपटासाठी गुरप्रीतने आपल्याकरिता कपडे डिझाइन करावेत अशी विवेकची इच्छा होती. पण, तिने मात्र त्यास नकार दिला. या कारणामुळे दोघांमध्ये नंतर दुरावा आला. अखेर एकमेकांवर अनेक आरोप केल्यानंतर दोघं एकमेकांपासून वेगळे झाल्याचे म्हटले जाते.
मल्लिका शेरावत – विजय सिंग
‘द बॅचलरेट इंडिया’ या रिअॅलिटी शोमधून मल्लिकाने विजय सिंगची जोडीदार म्हणून निवड केलेली. या दोघांचा साखरपुडाही झालेला मात्र लग्न होऊ शकले नाही. मल्लिकापेक्षा १२ वर्षांनी लहान असलेला विजय म्हणालेला की, शोमधील करारानुसार मल्लिकाने माझ्याशी वर्षभरात लग्न करावे किंवा मला सोडून द्यावे असे लिहले होते. तिने मला एक वर्षासाठी लॉसएन्जेलिसला बोलावले होते, पण मी गेलो नाही. आमच्या दोघांमध्ये असलेल्या वयाच्या मोठ्या फरकामुळे आमचं नातं जुळू शकत नसल्याचे इशारे नंतर तिने दिले. तिने माझे फोन उचलणंही बंद केलं. शेवटी रिअॅलिटी शोमध्ये जे काही झालं ते खोटेपणा होता हे समजताच मीसुद्धा तिला फोन करणं बंद केलं.
नील नितीन मुकेश – प्रियांका भाटिया
जवळपास दोन वर्ष नील आणि प्रियांका एकमेकांना डेट करत होते आणि त्यांचा साखरपुडाही झाल्याचे त्यावेळी वृत्त होते. लग्नापर्यंत त्यांची गाडी गेली असता त्या दरम्यान नीलला चित्रपटाच्या ऑफर्स येऊ लागल्या. आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित करू पाहणाऱ्या नीलने अखेर लग्न मोडण्याचा निर्णय घेतला.
शिल्पा शिंदे – रोमित राज
‘मायका’ मालिकेच्या सेटवर शिल्पा आणि रोमित एकमेकांच्या जवळ आले. २००९ साली ते गोव्यात लग्न करणार होते. लग्नाच्या पत्रिकाही छापून झालेल्या. दरम्यान, रोमित आपल्या कुटुंबाचा आदर करत नसल्याचे शिल्पाच्या लक्षात आले आणि तिने लग्न मोडण्याचा निर्णय घेतला.
राखी सावंत- इलेश परजुनवाला
‘राखी का स्वयंवर’ या २००९ साली आलेल्या रिअॅलिटी शोमध्ये राखी आणि इलेशचा साखरपुडा झाला. शोमध्ये निवडलेल्या व्यक्तीशीच विवाह करणार असल्याचे राखीने तेव्हा जाहीर केलेले. पण, काही महिन्यांच्या कालावधीनंतरच राखीने तिचे लग्न मोडले. इलेशशी पैशासाठीच आपण साखरपुडा केल्याचे तिने नंतर मान्यही केले होते.