बॉलिवूडची ‘धक धक गर्ल’ अर्थात माधुरी दीक्षितच्या प्रांजळ स्वभावाबद्दल अनेकांनाच माहिती आहे. ती सेटवर सहकाऱ्यांशी मिळून- मिसळून वागते, थट्टा-मस्करी करते अशा बऱ्याच गोष्टी तिच्याबद्दल सांगितल्या जातात. चित्रीकरणाचे काही गमतीशीर किस्सेही तुम्ही ऐकले असतील. पण जेव्हा तिचा राग अनावर होतो, तेव्हा मात्र सेटवर काही खरं नसतं. स्टार प्लस वाहिनीवरील ‘बाते विथ बादशहा’ या चॅट शोमध्ये नुकतीच माधुरीने हजेरी लावली. शाहरुख खान सूत्रसंचालन करत असलेल्या या शोमध्ये ‘दिल’, ‘राजा’, ‘मस्ती’ यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शक इंद्र कुमारसुद्धा सहभागी झाले होते. त्यांनीच माधुरीचा एक मजेशीर किस्सा यावेळी सांगितला.

‘दिल’ चित्रपटाच्या चित्रीकरणावेळीचा प्रसंग इंद्र कुमार यांनी सांगितला. ते म्हणाले की, ‘सहसा माधुरी कोणावर चिडत नाही, रागवत नाही. पण त्यावेळी पहिल्यांदाच मी तिला इतक्या रागात पाहिलं होतं. तिचा राग इतका अनावर झाला होता की, ती चक्क हॉकी स्टीक घेऊन अभिनेत्यामागे पळत होती. तो अभिनेता दुसरा तिसरा कोणी नाही, तर आमिर खान होता. सेटवर त्याने माधुरीसोबत प्रँक करण्याचा प्रयत्न केला, आणि नंतर त्यालाच ते महागात पडलं. आमिरच्या मागे ती हॉकी स्टीक घेऊन धावत सुटली आणि आमिर माझ्यामागे येऊन लपला. रागाने माधुरीचा चेहरा लालबुंद झाला होता आणि तिला पाहून मलाही भीती वाटू लागली होती. त्या प्रँकमध्ये आमिरची साथ तुम्हीसुद्धा दिली का, असा प्रश्न तिने मला विचारला. मी घाबरूनच नाही असं उत्तर दिलं. त्या दिवशी मीसुद्धा ठरवलं की, माधुरीसोबत मस्करी कधी करूच नये.’

वाचा : रजनीकांतच्या ‘२.०’च्या निर्मात्यांचा प्रसिद्ध हॉलिवूड स्टुडिओवर फसवणुकीचा आरोप

इंद्र कुमार यांच्या आगामी चित्रपटातून माधुरी आणि अनिल कपूर ही जोडी तब्बल १७ वर्षांनी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘तेजाब’, ‘परिंदा’, ‘राम लखन’ यांसारख्या चित्रपटांमध्ये माधुरी आणि अनिल कपूर यांनी एकत्र काम केलं होतं.