‘सुपर नाइट विथ ट्युबलाइट’ हा कार्यक्रम सध्या चर्चेचा विषय बनलाय आणि त्याचं कारणही तितकंच महत्त्वाचं आहे. आपला आगामी सिनेमा ‘ट्युबलाइट’च्या प्रमोशनसाठी दबंग खानने कॉमेडीचा किंग कपिल शर्माऐवजी सुनील ग्रोवरला निवडलं. दोन तासांच्या विशेष भागात सुनीलसोबत सलमान खान आपला आगामी चित्रपट ‘ट्युबलाइट’चं प्रमोशन करताना दिसणार आहे. या विशेष कार्यक्रमात टेलिव्हिजनची प्रसिद्ध अभिनेत्री मौनी रॉयसुद्धा डान्स सादर करणार आहे.

भाऊ सोहेल खानसोबत सलमान सोनी टीव्हीवरील ‘सुपर नाइट विथ ट्युबलाइट’ कार्यक्रमात प्रमोशन करणार आहे. याचं सूत्रसंचालन अपारशक्ती खुराना करणार असून डॉक्टर मशहूर गुलाटी या व्यक्तिरेखेमध्ये सुनील पुनरागमन करत आहे. त्याचबरोबर अली असगर, सुगंधा मिश्रासुद्धा प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहेत. तर मौनी रॉय सलमानच्या गाण्यांवर थिरकणार आहे. मौनी सलमानची खूप मोठी फॅन आहे हे सर्वांनाच ठाऊक आहे. मौनीच्या एका चाहत्याने कार्यक्रमाच्या शूटिंगदरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला असून थोड्याच वेळात हा व्हिडिओ चर्चेचा विषय बनलाय.

 

वाचा : माझ्यामुळेच कतरिना आज एक उत्तम डान्सर – रणबीर 

या व्हिडिओमध्ये डान्सचा सराव करत असतानाच मौनी कोणासोबतरी बोलताना दिसते. बोलून वळल्यावर मौनीच्या मागेच उभ्या असलेल्या सलमानला टक्कर लागते आणि त्यानंतर दोघेही हसताताना दिसतात. यामुळे नकळत मौनी सलमानच्या अधिकच जवळ गेल्याचे दिसले
याआधी बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर कोणासोबत काम करायला आवडेल असा प्रश्न मौनीला विचारले असता, ‘कारकिर्दीतली पहिली भूमिका सलमान खानसोबतच साकारण्याची प्रत्येक मुलीची इच्छा असते’ असं तिने म्हटलं होतं. त्यामुळे १८ जूनला प्रसारित होणाऱ्या या विशेष कार्यक्रमात मौनी आणि सलमानमधील केमिस्ट्री पाहण्यासाठी प्रेक्षक नक्कीच उत्सुक असतील.