बॉलिवूडमध्ये अनेक प्रकारच्या मसाल्यांचा तडका आहे. प्रेम, अफेअर, ब्रेकअप, आणि द्वेषही. अफेअर आणि ब्रेकअपच्या चर्चा तर सातत्याने होतच असतात. पण असेही काही कलाकार आहेत ज्यांच्यात ३६ चा आकडा आहे. यापैकी सर्वाधिक चर्चेत असलेले कलाकार म्हणजे करीना कपूर व प्रियांका चोप्रा. या दोघांमधील मतभेत प्रसारमाध्यमांपासून कधीच लपले नाहीत. दोघीही स्पष्टवक्त्या असल्याने मुलाखतींमध्ये एकमेकांविषयीचा राग बेधडकपणे व्यक्त करायच्या. अशाच एका मुलाखतीत प्रियांकाने करीनासाठी चक्क, ‘कोल्ह्याला द्राक्षे आंबट असतात’ ही म्हण वापरली होती.

‘ऐतराज’ चित्रपटात प्रियांका व करीनाने एकत्र काम केलं. यात करीना मुख्य भूमिकेत तर प्रियांका खलनायकाच्या भूमिकेत होती. चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर प्रियांकाच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यामुळे करीनाला काहीसा मत्सर निर्माण झाला.

२०१२ मध्ये करीनाचा ‘हिरोईन’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यावेळी तिने हा चित्रपट प्रियांकाच्या ‘फॅशन’पेक्षा कैकपटींनी चांगला असल्याचं मत मुलाखतींमध्ये व्यक्त केलं होतं. ‘फॅशन’ व ‘हिरोईन’ या दोन्ही चित्रपटांचं दिग्दर्शन मधूर भंडारकरने केलं होतं. इतकंच नव्हे तर, ”मला राष्ट्रीय पुरस्काराची पर्वा नाही,” असंही करीनाने म्हटलं होतं. प्रियांकाला ‘फॅशन’मधील दमदार अभिनयामुळे राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. हा पुरस्कार जिंकल्यानंतर ‘एनडीटीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत प्रियांकाने करीनावर पलटवार केला होता.

”मला असं वाटतं की एखादी गोष्ट मिळाली नाही की कोल्ह्याला द्राक्षे आंबटच वाटतात, यात मी आणखी वेगळं काय म्हणावं,” अशा शब्दांत प्रियांकाने सडेतोड उत्तर दिलं होतं. यावेळी बॉलिवूडच्या घराणेशाहीविरोधात वक्तव्य करत प्रियांका पुढे म्हणाली, ”मी जेव्हा इंडस्ट्रीमध्ये नवीन होती, तेव्हा माझे फार मित्र-मैत्रिणी नव्हत्या. मी जे काही कमावलं, ते माझ्या मेहनतीमुळे. तुम्ही कुठून आला आहात हे महत्त्वाचं नसून अभिनय कौशल्य असल्यास कोणीही स्टार होऊ शकतं हे मी सिद्ध करून दाखवलं.”

या ‘स्टार-वॉर’मुळे प्रियांका व करीनाने ‘ऐतराज’नंतर पुन्हा एकत्र काम केलंच नाही.