हिंदी सिनेसृष्टीचा एक काळ गाजवणारी हरहुन्नरी अभिनेत्री श्रीदेवी यांचे शनिवारी दुबईत आकस्मिक निधन झाले. ‘सोलवा सावन’ या सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण करणाऱ्या श्रीदेवी यांनी काही दशके प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. त्यांची लोकप्रियता इतकी होती की अनेकदा पुरुष अभिनेत्यांऐवजी केवळ श्रीदेवी यांच्या नावावर सिनेमा बॉक्स ऑफीसवर जोरदार कमाई करायचा. बरं हिंदी सिनेमातील पहिली लेडी सुपरस्टार ठरलेल्या या अभिनेत्रीची भूरळ केवळ भारतीय प्रेक्षकांना, निर्मात्यांना आणि दिग्दर्शकांना पडली होती असं नाही. तर त्यांनी हॉलिवूडमधील दिग्गजांनाही आपल्या अभिनयाने जिंकून घेतले होते. त्यातीलच एक नाव होते ‘ज्युरॅसिक पार्क’ फेम दिग्दर्शक स्टिव्हन स्पिलबर्ग यांचे.

ज्यावेळी श्रीदेवी त्यांच्या करिअरच्या सर्वोच्च स्थानी होत्या त्याच काळात म्हणजे १९९३च्या सुमारास स्टिव्हन स्पिलबर्ग हे ‘ज्युरॅसिक पार्क’ या सिनेमाची निर्मिती करत होते. त्यांनी त्यावेळी श्रीदेवी यांना सिनेमामध्ये एक छोटी भूमिका देऊ केली होती. मात्र भारतीय सिनेमांमध्ये एकापेक्षा एक दमदार सिनेमे देणाऱ्या श्रीदेवी यांना ती भूमिका त्यांच्यासारख्या अव्वल दर्जाच्या अभिनेत्रीच्या प्रतिष्ठेला शोभणारी नव्हती. म्हणून त्यांनी स्पिलबर्ग यांनी देऊ केलेल्या दुय्यम दर्जाच्या भूमिकेला थेट नकार दिला. त्यानंतर अगदी दशकभराहून अधिक काळाने ऐश्वर्या रायच्या रुपाने पहिला भारतीय चेहरा हॉलिवूडच्या सिनेमांमध्ये दिसला. श्रीदेवीने हा सिनेमा नाकारल्यानंतरही तो जगभरातील अव्वल दर्जांच्या सिनेमांपैकी एक ठरला.

वाचा : बोनी कपूर यांच्या दोन्ही पत्नींच्या मृत्यूबद्दलचा दुर्दैवी योगायोग

श्रीदेवी यांनी नाकारलेल्या हिंदी सिनेमांचीही यादी खूप मोठी आहे. मात्र त्यांनी जर ‘ज्युरॅसिक पार्क’ या सिनेमाचा सकारात्मकदृष्ट्या विचार केला असता तर हॉलिवूडच्या सिनेमात झळकणाऱ्या त्या पहिल्या बॉलिवूड अभिनेत्री ठरल्या असत्या.