हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते टॉम अल्टर यांचे शुक्रवारी रात्री निधन झाले. ते थिएटर कलाकार, लेखक, शायर आणि त्यासोबतच क्रीडा पत्रकारही होते. क्रिकेटची विशेष आवड असणाऱ्या टॉम यांनी टेलिव्हिजनवर सचिन तेंडुलकरची पहिली मुलाखत घेतली होती. त्यावेळी सचिन फक्त १५ वर्षांचा होता. काही लोकप्रिय हिंदी टीव्ही शोमध्ये त्यांनी भूमिका साकारल्याने या मुलाखतीच्या आधीही टॉम यांना प्रेक्षक चांगलेच ओळखत होते. पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर आलेल्या सचिनच्या चेहऱ्यावरचे दडपण या मुलाखतीत स्पष्टपणे जाणवत होते.

सचिनच्या काही आठवणी त्यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या एका मुलाखतीत सांगितल्या होत्या. सचिन नेट प्रॅक्टिस करत असताना दिलीप वेंगसरकर यांनी त्याची ओळख माझ्याशी करुन दिली होती. त्याच्याशी साधलेला संवाद मला अजूनही स्पष्ट आठवत आहे. त्याची ती पहिली व्हिडिओ मुलाखत होती. कॅमेरासमोर तो थोडासा लाजत होता, पण आत्मविश्वासाने त्याने मुलाखत दिली होती, असे त्यांनी सांगितले होते.

PHOTO : ‘बिग बॉस’चं नवं घर पाहिलंत का?

सचिनच्या ४४ व्या वाढदिवशी टॉम अल्टर यांनी आपल्या अनोख्या अंदाजात त्याला शुभेच्छा दिल्या होत्या. सचिनसाठी त्यांनी एक पत्र लिहिले होते. ‘सचिनसाठी आता आणखी वेगळे काय लिहिणार? सूर्याला कधी आरसा दाखवू शकतो का? चंद्राच्या सौंदर्याचे वर्णन शब्दांत केले जाऊ शकते का?, असेही त्यांनी पत्रात म्हटले होते.